मुंबईतील कमिशन एजंटची एसटीतून एक कोटीच्या दागिन्यांची सॅक लंपास, कोल्हापुरात घडला प्रकार
By उद्धव गोडसे | Published: July 1, 2024 04:20 PM2024-07-01T16:20:48+5:302024-07-01T16:22:14+5:30
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांकडून चोरट्यांचा शोध सुरू
कोल्हापूर : सराफांना दागिने पुरवणारे कमिशन एजंट सुजितसिंग सुखदेवसिंग चौहान (वय ४८, रा. वडाळा पूर्व, मुंबई) यांची सुमारे एक कोटी रुपये किमतीचे दीड किलो सोन्याचे दागिने असलेली सॅक चोरट्याने लंपास केली. हा प्रकार रविवारी (दि. ३०) रात्री साडेसातच्या सुमारास मध्यवर्ती बस स्थानकात पुण्याला जाणा-या एसटीत घडला. याबाबत चौहान यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, शाहूपुरी पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सराफांना होलसेल दागिने पुरवणारे कमिशन एजंट सुजितसिंग चौहान हे २८ जून रोजी मुंबईतून दागिने घेऊन निघाले. २८ आणि २९ जून रोजी ते पुण्यात मेहुण्याकडे थांबून काही सराफांना भेटले. त्यानंतर रविवारी दुपारी ते दोनच्या सुमारास एसटीने कोल्हापुरात पोहोचले. गुजरीत जाऊन ते तीन सराफांना भेटले. मात्र, त्यांच्याकडून कोणीच दागिन्यांची खरेदी केली नाही. त्यानंतर सायंकाळी पुण्याला परत जाण्यासाठी ते मध्यवर्ती बसस्थानकात गेले. साडेसातला सुटणा-या विनावाहक शिवनेरी एसटीचे तिकीट मिळाल्यानंतर ते एसटीत बसले.
तीन नंबर सिटवर बसताना त्यांनी पाठीवरील काळ्या रंगाची दागिन्यांची सॅक सिटवरील रॅकमध्ये ठेवली. पाच ते सात मिनिट ते मोबाइल पाहत बसले. त्यानंतर काही वेळाने रॅॅकमध्ये पाहताच त्यांना दागिन्यांची सॅक आढळली नाही. त्यांनी एसटीत आणि आजूबाजूला शोध घेण्याचा प्रयत्न केला. तब्बल दीड किलो दागिन्यांच्या सॅकची चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.