कोल्हापूर: बांधकाम कामगाराचा इमारतीवरून पडून जागीच मृत्यू, यमगेतील दुर्देवी घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 12:20 PM2022-09-08T12:20:25+5:302022-09-08T12:20:48+5:30
राजेंद्र यांच्या अपघाती मृत्यूने सोरप कुटुंब उघड्यावर पडले आहे.
मुरगूड : यमगे येथील राजेंद्र पांडुरंग सोरप (वय ४७) यांचा मुरगूड येथे इमारत बांधकाम करत असताना पडून मृत्यू झाला. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. उपचारासाठी त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सदर घटनेची मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली आहे. राजेंद्र यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.
अधिक माहिती अशी अत्यंत सामान्य कुटुंबातील सोरप हे काही वर्षांपूर्वी एमआयडीसीमध्ये कामावर होते. पण सदरची कंपनी बंद पडल्याने शेवटी नाइलाजास्तव चार ते पाच वर्षांपासून सेन्ट्रिंग कामगार म्हणून अनेक ठिकाणी काम करत होते. सध्या मुरगूड येथील ओंकार दाभोळे यांच्या घराचे ते काम करत होते. दुपारी लॉप लेंटन वर काम करत असताना अचानक खाली कोसळले. त्यांच्या तोंडावर आणि डोक्याच्या मागील बाजूस जोराचा मार लागला होता. तत्काळ त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वी मृत घोषित केले.
हातावर पोट असतानाही आपल्या दोन्ही मुलींना उच्चशिक्षित करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या राजेंद्र याची मोठी मुलगी प्राची ही वैभववाडी येथे बी. फार्मचे शिक्षण घेत आहे तर लहान श्रेया ही सध्या नववीमध्ये शिकते. राजेंद्र यांच्या अपघाती मृत्यूने सोरप कुटुंब उघड्यावर पडले आहे. रात्री उशिरा त्यांच्या मृतदेहावर यमगेत अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षाविसर्जन आज गुरुवारी यमगेत आहे. राजेंद्र यांच्या मागे पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.