Kolhapur: कार खड्ड्यात कोसळून खुपिरेतील दाम्पत्य ठार, दोन मुले जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 01:05 PM2024-11-24T13:05:26+5:302024-11-24T13:05:42+5:30
कोपार्डे : कर्नाटकातील ऐनापूर येथे चारचाकी गाडी उलटून झालेल्या अपघातात खुपिरे (ता. करवीर) येथील पती-पत्नी ठार झाले. आदर्श युवराज ...
कोपार्डे : कर्नाटकातील ऐनापूर येथे चारचाकी गाडी उलटून झालेल्या अपघातात खुपिरे (ता. करवीर) येथील पती-पत्नी ठार झाले. आदर्श युवराज पांडव (वय २७), पत्नी शिवानी आदर्श पांडव (२०) अशी त्यांची नावे आहेत. तसेच त्यांचा मुलगा राजवीर (वय ३ वर्षे ) मुलगी अन्वी (वय ६ महिने ) हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास झाला.
घटनास्थळावर मिळालेली माहिती अशी, आदर्श युवराज पांडव यांची सासुरवाडी करनूर (ता. कागल) येथे आहे. आदर्श यांच्या मेहुणीचे लग्न ऐनापुर (कागवाड) येथे शुक्रवारी होते. त्यामुळे आदर्श आणि त्याची पत्नी शिवानी हे ऐनापूर-कागवाड येथे सहकुटुंब लग्नाला गेले होते.
लग्नाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पांडव दांपत्य मुलांसह तसेच त्यांच्या सासूरवाडीचे चारचाकी गाडीतून करनूर गावाकडे- घरी परत येत होते.
कागवाड पासून सुमारे दहा किलोमीटरवर असलेल्या ऐनापुर या ठिकाणी आदर्शचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे गाडी रस्त्याच्या बाजूच्या नाल्यामध्ये कोसळली. त्यामुळे गाडीचा पुढील भाग दलदल व पाण्यामध्ये गेला तसेच आदर्श व शिवानीच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. गाडीतील सर्वजण किरकोळ जखमी झाले.
घटनेची माहिती आदर्श चे भाऊ आशिष व अक्षय यांना समजल्यानंतर त्यांचे नातेवाईक तानाजी जाधव ( वरणगे ) यांच्यासह तातडीने घटनास्थळी पोहोचले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. मयत शिवानीची मुलगी अवघी सहा महिन्याची आहे. सुदैवाने ती बचावली. घटनेची नोंद कागवाड पोलीस ठाण्यात झाली आहे.