Kolhapur: जोतिबाच्या दर्शनासाठी जाण्यापूर्वीच काळाचा घाला, पंचगंगेत बुडून कर्नाटकातील भाविकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 11:52 IST2025-04-07T11:51:46+5:302025-04-07T11:52:10+5:30
कोल्हापूर : जोतिबाच्या दर्शनासाठी जाण्यापूर्वी पंचगंगा नदीत अंघोळ करताना शंकर जालिंदर गवळीकर (वय ३२, रा. मिरकल, ता. बसवकल्याण, जि. ...

Kolhapur: जोतिबाच्या दर्शनासाठी जाण्यापूर्वीच काळाचा घाला, पंचगंगेत बुडून कर्नाटकातील भाविकाचा मृत्यू
कोल्हापूर : जोतिबाच्या दर्शनासाठी जाण्यापूर्वी पंचगंगा नदीत अंघोळ करताना शंकर जालिंदर गवळीकर (वय ३२, रा. मिरकल, ता. बसवकल्याण, जि. बिदर, कर्नाटक) याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. ६) पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. अग्निशामक दलाच्या जवानांसह जीवरक्षक उदय निंबाळकर यांनी शोध घेऊन मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.
पंचगंगा नदीघाटावरून मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील मिरकल येथून ९ तरुण जोतिबाच्या दर्शनासाठी आले होते. रविवारी पहाटे कोल्हापुरात पोहोचताच ते अंघोळीसाठी पंचगंगा नदीघाटावर गेले. अंघोळ करून ते देवदर्शनासाठी जोतिबा डोंगरावर जाणार होते. तत्पूर्वी पाण्यात उतरलेला शंकर गवळीकर हा बुडाला. त्याला पोहता येत होते. नदीपात्रात मध्यावर जाऊन आल्यानंतर तो पुन्हा पाण्यात उतरताच बुडाला.
याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी धाव घेऊन शोध सुरू केला. दोन तासांच्या शोधमोहिमेत मृतदेह सापडला नाही. अखेर जीवरक्षक उदय निंबाळकर यांनी सकाळी सातच्या सुमारास मृतदेह शोधून पाण्यातून बाहेर काढला. सीपीआरमध्ये उत्तरीय तपासणी करून मृतदेह मित्रांच्या ताब्यात देण्यात आला. शंकर गवळीकर हा गवंडीकाम करीत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी, चार भाऊ असा परिवार आहे.
देवदर्शनाविनाच परतले
रात्रभर प्रवास करून पहाटे कोल्हापुरात पोहोचलेले तरुण अंघोळीनंतर देवदर्शनासाठी जोतिबा डोंगरावर जाणार होते. त्यानंतर अंबाबाईचे दर्शन घेऊन गावाकडे जाणार होते. मात्र, शंकरचा बुडून मृत्यू झाल्याने देवदर्शनाविनाच त्यांना परत जावे लागले.