जोतिबाला निघालेल्या भाविकाची दुचाकी ट्रकने उडवली ; एक जागीच ठार, दोघे जखमी

By उद्धव गोडसे | Published: September 10, 2023 08:08 PM2023-09-10T20:08:09+5:302023-09-10T20:08:21+5:30

पुणे-बेंगळुरू महामार्गावर टोप येथे अपघात

A devotee who was going to Jotiba was blown away by a truck; One killed on the spot, two injured | जोतिबाला निघालेल्या भाविकाची दुचाकी ट्रकने उडवली ; एक जागीच ठार, दोघे जखमी

जोतिबाला निघालेल्या भाविकाची दुचाकी ट्रकने उडवली ; एक जागीच ठार, दोघे जखमी

googlenewsNext

कोल्हापूर : जोतिबाला निघालेल्या भाविकांच्या दुचाकीला भरधाव ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाले, तर दोघे जखमी झाले. पुणे-बेंगळुरू महामार्गावर टोप येथे कासारवाडी फाट्यावर रविवारी (दि. १०) दुपारी साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला. विठ्ठल जयसिंग मोहिते (वय ५६, रा. घोणशी, ता. कराड, जि. सातारा) असे मृताचे नाव आहे. ओंकार रवींद्र जाधव (वय २२, रा. घोणशी) आणि पवन बाळासाहेब पाटील (वय २४, रा. टोप, ता. हातकणंगले) हे दोघे अपघातात जखमी झाले.

याबाबत अधिक माहिती अशी की, घोणशी येथील विट्ठल मोहिते आणि ओंकार जाधव हे दोघे दुचाकीवरून रविवारी दुपारी जोतिबा येथे देवदर्शनासाठी निघाले होते. टोप येथे कासारवाडी फाट्याकडे वळण्यासाठी दुभाजकाच्या जागेत थांबले असता, पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने मोहिते यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत मोहिते आणि जाधव दोघे रस्त्यावर फेकले गेले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे मोहिते यांचा जागीच मृत्यू झाला, तर ओंकार गंभीर जखमी झाला. याचवेळी चालकाने ट्रक डाव्या बाजूला रस्त्याकडेला घेण्याचा प्रयत्न केला असता, आणखी एका दुचाकीला धडक बसून त्यावरील पवन पाटील हा तरुण किरकोळ जखमी झाला. जखमींना १०८ रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल केले. मोहिते यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. प्रथमोपचारानंतर ओंकार याला खासगी रुग्णालयात हलवले.

अपघाताची माहिती मिळताच शिरोली एमआयडीसी पोलिसांनी अपघातस्थळी पोहोचून पंचनामा केला. ट्रकचालक सचिन लक्ष्मी घाळी (वय २५, रा. हुबळी, कर्नाटक) याला पोलिसांनी अटक केली असून, ट्रक जप्त केला. अपघातग्रस्त ट्रक पुण्याहून बेळगावकडे निघाला होता. अपघाताची नोंद शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली.

Web Title: A devotee who was going to Jotiba was blown away by a truck; One killed on the spot, two injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.