सावधान.. उंची वाढवण्याचा फंडा, तरुणांना बसतो गंडा; पोलिस भरतीतील तरुणांची आगतिकता

By विश्वास पाटील | Published: June 12, 2024 01:04 PM2024-06-12T13:04:56+5:302024-06-12T13:06:20+5:30

विश्वास पाटील कोल्हापूर : पोलिस, लष्करी भरतीत उंची कमी असेल, तर संधी हुकते हेच लक्षात घेऊन कोल्हापूर शहराशेजारील करवीर ...

A doctor in Kolhapur invented a fund to give height increase medicine | सावधान.. उंची वाढवण्याचा फंडा, तरुणांना बसतो गंडा; पोलिस भरतीतील तरुणांची आगतिकता

सावधान.. उंची वाढवण्याचा फंडा, तरुणांना बसतो गंडा; पोलिस भरतीतील तरुणांची आगतिकता

विश्वास पाटील

कोल्हापूर : पोलिस, लष्करी भरतीत उंची कमी असेल, तर संधी हुकते हेच लक्षात घेऊन कोल्हापूर शहराशेजारील करवीर तालुक्यातील औद्योगिकनगरीत एका डॉक्टरने साडेतीनशे ते चार हजार रुपये घेऊन उंची वाढवून देण्याचे औषध देण्याचा फंडा शोधून काढला आहे. त्याला तरुण मोठ्या संख्येने बळी पडत आहेत. 

आतापर्यंत पाच हजारांवर तरुणांनी औषध घेतल्याचा दावा केला जात आहे. त्याहिशोबाने विचार केल्यास नुसत्या उंचीच्या औषधावर एक ते दोन कोटी रुपये उकळले गेल्याचे दिसत आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा ते अगदी मराठवाड्यातूनही हे औषध नेण्यासाठी तरुणांची गर्दी उसळत आहे; परंतु अशी कोणती पावडर किंवा झाडपाल्याचे औषध खावून कुणाचीही उंची वाढवणे शक्य नसल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. 

सायबर चौकात ३ जूनला झालेल्या अपघातात पोर्ले तर्फ ठाणे (ता.पन्हाळा) येथील अनिकेत आनंदा चौगुले (वय २५) याचा मृत्यू झाला. तो पोलिस भरतीसाठी प्रयत्न करत होता; परंतु त्याची उंची कमी असल्याने त्याला भरतीवेळी भेटलेल्या कुण्या मित्राने अमुक गावात उंची वाढवण्याचे औषध मिळत असल्याचे सांगितले. तो ते औषध घेऊन येताना अपघातात ठार झाला. त्यावरून उंची वाढवायचे असे कुठले औषध आहे याचा शोध लोकमतने प्रत्यक्ष त्या गावात जाऊन घेतला.
 
क्लिनिकमध्ये उंची दर्शवणारी मोजपट्टी भिंतीलाच लावून ठेवलेली होती. सांगली, सातारासह कागल तालुक्यातील ८ ते ९ तरुण तिथे औषध नेण्यासाठी आले होते. पहिल्यांदा पंधरवड्यात उंची नाही वाढली तर तीन महिने सलग औषध घ्यावे लागते. त्यासाठी किमान ४ हजार मोजावे लागतात. गेल्या चार वर्षापासून तिथे असे औषध दिले जात आहे. डॉक्टर किंवा त्यांच्या औषधाबद्दल स्थानिकांना फारसे काही माहीत नाही.

वैद्यकीय तज्ज्ञ काय सांगतात..?

  • मुलीची उंची पाळी सुरू झाल्यानंतर दीड वर्षापर्यंतच वाढते. मुलांची २० वर्षांपर्यंतच वाढ असते.
  • आई-वडिलांची उंची कमी असेल तर मुलाची उंची तेवढीच राहते.
  • लहानपणापासून व्यायाम, सकस आहार घेतल्यास उंची वाढते.
  • हाडांची लांबी वाढली तरच उंची वाढते आणि ही लांबी वाढवण्याचे कोणतेही औषध नाही; परंतु लोकांना फसायला आवडते.
  • ग्रोथ हार्मोन्सची इंजेक्शन्स देऊन उंची वाढवतात; परंतु ते सरसकट नाही.


कोणत्याही प्रकारचे पावडर स्वरूपातील किंवा जडीबुटीचे औषध देऊन उंची वाढवण्याचा दावा करणे हा सरळसरळ फसवणुकीचाच प्रकार आहे. तरुणांनी अशा फसव्या औषधांच्या मागे धावू नये. - डॉ.विद्या पाटील, सीपीआर जिल्हा रुग्णालय, कोल्हापूर
 

उंची वाढवून देण्याचा दावा करून तरुणांकडून पैसे उकळणे हा मॅजिक रेमिडीज ॲक्ट १९५४, तर कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन सेक्शन ३३ नुसार गंभीर गुन्हा आहे. संबंधित डॉक्टरने त्यांच्या फलकावर लिहिलेल्या पदव्याही कितपत अधिकृत आहेत याबद्दलही साशंकताच आहे. - डॉ. सुनील पाटील, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन

Web Title: A doctor in Kolhapur invented a fund to give height increase medicine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.