अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
By संदीप आडनाईक | Published: September 21, 2024 11:19 PM2024-09-21T23:19:11+5:302024-09-21T23:19:35+5:30
चाळीस कर्मचारी करत आहेत मोजणी
संदीप आडनाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरातील दानपेटीत शनिवारपर्यंत १ कोटी ८४ लाख ४०७० रुपयांची रोख रक्कम जमा झाली आहे. वर्षभरात या दानपेटीत भाविकांकडून अंबाबाई चरणी जमा होणाऱ्या रोख रकमेची मोजदाद देवस्थान समितीने बुधवार दि. १८ सप्टेंबरपासून सुरू केले आहे. पहिल्याच दिवसाच्या मोजणीत मंदिर समितीला ४८ लाख ८१ हजार ५५५ रुपयांचे दान मिळाले. मंदिराचा गाभारा आणि परिसरात देवस्थान समितीने १२ दानपेट्या बसवल्या आहेत.
दरवर्षी जिल्ह्यासह राज्यातील अनेक भाविक करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापुरात येत असतात. भक्तांकडून नवस, श्रद्धा आणि सेवेकरिता अशा विविध कारणांसाठी मंदिरातील दक्षिणा पेटीत भरभरून दान केले जाते. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील या दानपेट्यातील रोख रक्कम मोजण्याचे काम बुधवारी दुपारी सुरू केले होते.
दानपेट्यात दहा, वीस, पन्नास आणि शंभरच्या नोटांचे प्रमाण जास्त आहे. सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली मंदिर प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून या नोटा मोजून बंडल करून ठेवायचे काम सुरू केले होते. देवस्थान समितीतील ४० कर्मचारी, मंदिरातील सुरक्षा रक्षक, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तीन कर्मचाऱ्यांकडून हे दान मोजले जात आहे. काही भक्तांनी दान पेटीत सोने, चांदीदेखील टाकले आहेत. ते वेगवेगळे करून त्याची शुद्धता तपासून त्याचेदेखील वजन आणि आकडेवारी काढण्यात येणार आहे. पैसे मोजण्यासाठी मशिन देखील आणले होते.
दोन पेट्या मोजणे बाकी
बुधवारी पहिल्या दिवशी पहिल्या दानपेटीत ४८,८१,५५५, गुरुवारी दुसऱ्या दानपेटीत ७६,७९,०३०, शुक्रवारी चौथ्या दानपेटीत २,२३,५११, पाचव्या पेटीत २,०७,१९१, सहाव्या पेटीत २,३७,२०२, सातव्या पेटीत २३,५७,६७२, आठव्या पेटीत २,९६,१९१ रुपयांचे दान मिळाले. शनिवारी तिसरी पेटी उघडण्यात आली, त्यात ४,८९,६१०, तसेच ११ व्या पेटीत १३,५४,५३५ आणि १२ व्या पेटीत ६,७७,५७३ रुपयांचे दान मोजले. अजून दोन पेट्यांमधील दान मोजणे बाकी आहे.