कोल्हापुरातील मजलेत ड्रायपोर्ट होणारच, खासदार धैर्यशील मानेंनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 12:11 PM2023-07-08T12:11:58+5:302023-07-08T12:12:14+5:30

सांगलीचा प्रस्ताव आधी गेल्याने त्यांची कार्यवाही लवकर झाली असेल; पण तेथे झाले म्हणून कोल्हापुरातील नियोजित ड्रायपोर्ट होणार नाही हा समज चुकीचा

A dry port will be built on the ground majle in Kolhapur, MP Darhysheel Mane informed | कोल्हापुरातील मजलेत ड्रायपोर्ट होणारच, खासदार धैर्यशील मानेंनी दिली माहिती

कोल्हापुरातील मजलेत ड्रायपोर्ट होणारच, खासदार धैर्यशील मानेंनी दिली माहिती

googlenewsNext

कोल्हापूर : मजले-तमदलगेच्या माळावर ड्रायपोर्ट उभारण्यासाठी खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मान्यता दिली आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी करून पुढील कार्यवाही अंतिम टप्प्यात आणली आहे. सांगली जिल्ह्यातील ड्रायपोर्टचा प्रस्ताव वेगळा असून, त्याचा कोल्हापूर जिल्ह्यात होणाऱ्या नियोजित ड्रायपोर्टवर कोणताही परिणाम होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत लवकरच मजलेत ड्रायपोर्टची उभारणी केली जाणार असल्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी शुक्रवारी दिली.

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या रत्नागिरी-नागपूर महामार्गालगत ड्रायपोर्ट उभारण्यासाठी खासदार माने व सांगलीचे खासदार संजय पाटील यांनी मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. यासाठी सांगलीतील सलगरे, रांजणी व कोल्हापूर जिल्ह्यातील मजले-तमदलगे येथील जागेची पाहणी करण्यात आली होती. नुकतेच सांगली जिल्ह्यात सलगरे येथे ड्रायपोर्ट उभारण्यासाठी उद्योग विभागाकडून जागा हस्तांतरित करण्यात आल्याने कोल्हापूर जिल्ह्याला डावलले की काय, अशी भावना निर्माण झाली. 

सांगली जिल्ह्यातील काहींनी समाजमाध्यमावर पोस्ट करत ड्रायपोर्ट खेचून आणल्याचे मत व्यक्त केल्याने संभ्रम निर्माण झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर निर्यात, फौंड्री उद्योग, वस्त्रोद्योगासाठी हे ड्रायपोर्ट उपयुक्त ठरणार आहे. शिवाय कोकण, कर्नाटकातील काही जिल्ह्यांसाठी ते लाभदायक आहे. मंत्री गडकरी यांनीच या ड्रायपोर्टला मान्यता दिली आहे. 

सांगलीचा प्रस्ताव आधी गेल्याने त्यांची कार्यवाही लवकर झाली असेल; पण तेथे झाले म्हणून कोल्हापुरातील नियोजित ड्रायपोर्ट होणार नाही हा समज चुकीचा आहे. सध्या मजलेतील वनसंपदेच्या जागेबाबत प्रक्रिया सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ही जागा एमआयडीसीकडे हस्तांतरित केली जाईल, त्यानंतर ड्रायपोर्टच्या कामाची पुढील कार्यवाही होणार असल्याचे खासदार माने यांनी सांगितले.

Web Title: A dry port will be built on the ground majle in Kolhapur, MP Darhysheel Mane informed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.