आता दूरशिक्षण केंद्रातून घेता येणार ‘दुहेरी पदवी’, विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 12:45 PM2022-09-02T12:45:09+5:302022-09-02T12:45:32+5:30
ही संधी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठीच्या अभ्यासक्रमापासून लागू आहे.
कोल्हापूर : नियमित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दूरशिक्षण पद्धतीने दुहेरी पदवी घेण्याची सुविधा शिवाजी विद्यापीठाच्या दूरस्थ (दूरशिक्षण) आणि ऑनलाइन शिक्षण केंद्रामार्फत दिली जाणार आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक डॉ. डी. के. मोरे यांनी गुरुवारी केले. शिवाजी विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्रामार्फत आयोजित केलेल्या प्रवेश प्रक्रियेबाबतच्या बैठकीत डॉ. मोरे बोलत होते. यावेळी उपकुलसचिव डॉ. एन. जे. बनसोडे, सी. ए. कोतमिरे, आदी उपस्थित होते.
विद्यापीठ अनुदान आयोगाने दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या सर्व बी.ए., बी.कॉम., एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी. (गणित) आणि एम.बी.ए. अशा एकूण बारा अभ्यासक्रमांना मान्यता दिली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांना एकाच वेळी अनेक कौशल्ये संपादन करण्यासाठी तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार एकाच वेळी पदविका आणि पदवी, अथवा दोन पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित होता येणार आहे.
ही संधी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठीच्या अभ्यासक्रमापासून लागू आहे. यामुळे पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना दुसऱ्या विषयाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचीही निवड करता येईल. विषय निवडण्याची कोणतीही सक्ती विद्यार्थ्यांवर असणार नाही, अशी माहिती डॉ. मोरे यांनी दिली.
अभ्यासक्रम प्रत्यक्ष उपस्थितीतून पूर्ण करता येईल
दोन्ही अभ्यासक्रम विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थितीच्या माध्यमातून पूर्ण करू शकतील. एक अभ्यासक्रम प्रत्यक्ष वर्ग उपस्थिती आणि दुसरा अभ्यासक्रम मुक्त (ओपन) किंवा दूरशिक्षणातील अथवा ऑनलाईन स्वरूपातीलही असू शकतो. दोन्ही अभ्यासक्रम ऑनलाईनही किंवा मुक्त अथवा दूरशिक्षण पद्धतीतीलही असू शकतात, असे डॉ. मोरे यांनी सांगितले.