पन्नास हजार मोजा, ‘कुणी’बी दाखला काढा; आपले सरकार केंद्रचालक रॅकेटचे सूत्रधार

By भीमगोंड देसाई | Published: September 8, 2023 08:04 AM2023-09-08T08:04:21+5:302023-09-08T08:04:28+5:30

या रॅकेटचे सूत्रधार आणि पैसे मागणारे बहुतांशी ‘आपले सरकार केंद्रचालक’ आहेत.

A fake racket has been created to give proof of Kunbi caste; Apale Sarkar is the mastermind of the central racket | पन्नास हजार मोजा, ‘कुणी’बी दाखला काढा; आपले सरकार केंद्रचालक रॅकेटचे सूत्रधार

पन्नास हजार मोजा, ‘कुणी’बी दाखला काढा; आपले सरकार केंद्रचालक रॅकेटचे सूत्रधार

googlenewsNext

- भीमगोंडा देसाई 

कोल्हापूर : किमान पन्नास हजार मोजा आणि कुणबी दाखला काढा, मागेल तितके पैसे देणार नसाल तर पूर्वीच्या कागदपत्रांतील ‘कु’चे कुळवाडी म्हणजे मराठा आहे म्हणून तुम्हाला दाखला मिळणार नाही, असे स्पष्ट उत्तर मिळते. पैसे मोजण्याची तयारी असेल तर ‘कु’चे कुणबी होते. दाखला सहजपणे मिळून जातो, असे रॅकेट कुणबी जातीचा दाखला देण्यासाठी तयार झाले आहे. 

या रॅकेटचे सूत्रधार आणि पैसे मागणारे बहुतांशी ‘आपले सरकार केंद्रचालक’ आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी आल्यानंतर कागदपत्रे पाहून दर सांगतात. सांगेल तितके पैसे दिले तर दाखल्यासाठीची पुढील कार्यवाही सुरू होते; अन्यथा त्रुटी काढली जाते. दाखल्यासाठी दिलेल्या खोक्यात तलाठी, सर्कल, नायब तहसीलदार, प्रांताधिकारी कार्यालय वाटेकरी असतात, असा सार्वत्रिक आरोप आहे. त्यामुळे पैसे टाकले की कुणबी दाखला ‘कुणी’बी काढू शकतो, अशी व्यवस्था आहे.  

प्रत्येक टप्प्यावर अशी होते लूट

दाखल्यासाठी मोडी लिपीतील कागदपत्रे काढण्यासाठी मोडी वाचणाऱ्या व्यक्तीची गरज असते. तो तालुक्याच्या रेकॉर्ड रूमपर्यंत येण्यासाठी दोन हजार रुपये घेतो. कागदपत्रे शोधून मिळविण्यासाठी तीन हजार रुपये द्यावे लागतात. कागदपत्रे मिळाल्यानंतर सर्कल चौकशीसाठी स्वत: अर्जदारांनीच दोन ज्येष्ठ व्यक्तींना घेऊन जायचे. अहवालासाठी सर्कल पातळीवर कमीतकमी पाच हजार रुपये मोजावे लागतात. तलाठी ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत कुणबी दाखल्यांसाठी खुलेआम लूट केली जाते. 

जास्त पैसे दिले तर कुणबीसाठीचे पुरावे
कुणबी किंवा इतर ओबीसीमधील जातीचा दाखला काढण्यासाठी जास्त पैसे मोजले तर कागदोपत्री पुरावे नसले तरी खाडाखोड करून पुरावे तयार केले जातात. यासाठी मात्र लाखांत पैसे मोजण्याची तयारी असावी लागते.

Web Title: A fake racket has been created to give proof of Kunbi caste; Apale Sarkar is the mastermind of the central racket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.