कोल्हापुरातील फॅशन डिझायनर मुलीने शेतकरी तरुणाशी बांधली लग्नगाठ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 01:28 PM2023-05-09T13:28:27+5:302023-05-09T13:28:59+5:30
शेतकरी मुलगा नकोला दिला फाटा
शिरोळ (जि. कोल्हापूर) : सध्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नावरून मोठी गंभीर समस्या निर्माण झाली आहे. शिक्षित तरुणी शेतकरी मुलगा करून घेण्यास नकार देतात, हे चित्र असताना शिरोळ तालुक्यातील जांभळी गावातील फॅशन डिझायनर असलेल्या गायत्री यादवने शेतकरी तरुणाशी विवाह करून इतर मुलींसमोर आदर्श घालून दिला आहे.
‘शेतकरी मुलगा नको गं बाई’ हेच वाक्य मुलींच्या तोंडून ऐकायला मिळते. शेतकरी कुटुंबदेखील आपल्या मुलीला शेतकरी मुलाला द्यायला तयार नाहीत, हे आजचे चित्र आहे. मुलगा नोकरदारच हवा, मोठ्या कंपनीत नोकरी करणारा हवा, अशी मुलींबरोबर त्यांच्या कुटुंबियांची अपेक्षा आहे. तसेच शेतकऱ्याला आपल्या मुलाच्या लग्नासाठी पै-पाहुण्यांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी मुलांची लग्न ठरत नाहीत, हे वास्तव चित्र आहे.
दरम्यान, जांभळी (ता. शिरोळ) येथील गायत्री यादव या सुशिक्षित युवतीने शेतकरी नवरा निवडला आहे. गावातीलच अनिल कदम या पदवीधर शेतकरी तरुणासोबत लग्नदेखील थाटामाटात पार पडले. गायत्री ही पदवीधर आहे. पदवीनंतर तिने फॅशन डिझायनरचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
शिरोळ येथील दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी शेतकरी नवरा करून घ्यावा, असे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मी शेतकरी मुलाशी विवाह केला. माझे वडील नोकरदार आहेत. शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून, देश हा शेतीवरच चालत आहे. त्यामुळे शेतकरी हा राजा असून, त्याची मी राणी झाले आहे. - गायत्री यादव, नवविवाहिता, जांभळी