कोल्हापूर जिल्हा परिषदेतून एका महिला कर्मचाऱ्याची रवानगी थेट मेंटल हॉस्पिटलमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 01:50 PM2023-02-24T13:50:28+5:302023-02-24T13:51:59+5:30
गेले दोन महिने अनेकांना वाट्टेल तसे बोलणे, चिठ्ठीत तुमची नावे टाकून आत्महत्या करणार, असेही बडबडत होती. अंगारा ठेवणे, नारळ ठेवणे असेही प्रकार करत होती.
कोल्हापूर : जिल्हा परिषदेतून थेट रत्नागिरी येथील मेंटल हॉस्पिटलमध्ये एका महिला कर्मचाऱ्याला गुरुवारी दाखल करण्यात आले. दुपारी रुग्णवाहिकेतून या महिलेला रत्नागिरीला पाठविण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या एका विभागातील ही महिला मानसिक त्रासामुळे गेले दोन महिने अनेकांना वाट्टेल तसे बोलत होती. चिठ्ठीत तुमची नावे टाकून आत्महत्या करणार, असेही बडबडत होती. अंगारा ठेवणे, नारळ ठेवणे असेही प्रकार करत होती.
ती राहात असलेल्या शेजाऱ्यांबरोबरही तिची भांडणे झाली असून, कोणीही नातेवाईक तिच्या मदतीला येत नाहीत. नवऱ्याशी घटस्फोट घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशा विचित्र परिस्थितीत तिच्यावर मानसिक परिणाम झाल्यामुळे तिचे मानसिक संतुलन बिघडले आहे. अखेर तिच्या महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मुलीने याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्याशी चर्चा केली. त्यांच्याकडे या महिलेबद्दल अनेकांनी तक्रारीही केल्या होत्या.
चव्हाण यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांना सांगून रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. त्यानंतर या महिलेला रत्नागिरीला उपचारासाठी पाठविण्यात आले. दुपारी रुग्णवाहिका जिल्हा परिषदेत आल्यानंतर तेथे गर्दी झाली होती.