कोल्हापुरातील बांबवडेत राहत्या घरास आग, ..अन् मोठा अनर्थ टळला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 04:32 PM2022-11-22T16:32:20+5:302022-11-22T16:32:40+5:30
आगीत प्रापंचिक साहित्य जळाल्याने मोठे नुकसान झाले
आर.डी. पाटील
बांबवडे : शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे येथील सरुड फाट्या नजीक असणाऱ्या संभाजी श्रीपती शेळके व सदाशिव श्रीपती शेळके यांच्या राहत्या घरात आग लागली. या आगीत सुमारे साडेतीन लाख रुपयाचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सरुड फाट्यांनाजीक संभाजी शेळके यांच्या घरामध्ये विजय रघुनाथ कांबळे आयेशा जहांगीर आत्तार व संगीता रमेश शेळके हे तीन भाडेकरू राहत होते. यातील आशा आत्तार यांच्या घरातील चूल पेटलेली होती व ते कुलूप लावून बाहेर गेले होते. यावेळी घराला आग लागली. घर बंद असल्याने शेजारच्याही लवकर लक्षात आले नाही. काही वेळानंतर आजूबाजूच्या लोकांनी धूर पाहून घराचे कुलूप तोडून सिलेंडर बाहेर काढल्याने पुढचा अनर्थ टाळला.
याबाबत अग्निशमन दलाला माहिती मिळताच जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली. त्यामुळे शेजारची घरे आगीपासून वाचली. मात्र, आगीत प्रापंचिक साहित्य जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे. घटनेचा पंचनामा मंडल अधिकारी अतुल नलवडे, तलाठी नसीम मुलांनी यांनी केला आहे.