Kolhapur: नराधम नातेवाइकाने पाच वर्षाच्या बालिकेवर केला अत्याचार, संशयित पोलिसाच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 12:55 IST2025-02-12T12:54:58+5:302025-02-12T12:55:13+5:30
संशयित जाधवकडून गुन्ह्याची पुनरावृत्ती

Kolhapur: नराधम नातेवाइकाने पाच वर्षाच्या बालिकेवर केला अत्याचार, संशयित पोलिसाच्या ताब्यात
हातकणंगले : आळते (ता . हातकणंगले) येथे पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना मंगळवार दुपारी दीड वाजता घडली. संशयित प्रवीण रामचंद्र जाधव (वय ३३, रा. चापोडी महोडे, राशिवडे, ता. राधानगरी ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. जयसिंगपूर उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोळंके यांनी पोलिस ठाण्याला भेट देऊन घटनेची माहिती घेत जलदगतीने तपास करण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत हातकणंगले पोलिसातून मिळाली माहिती अशी, नराधम संशयित प्रवीण जाधव हा अत्याचार झालेल्या मुलीचा नातेवाईक आहे. तो विवाहित असून त्याला नऊ वर्षाचा मुलगा आहे. जाधव हा हातकणंगले येथील एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करतो. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता तो आळते येथील नातेवाइकांच्या घरी आला होता. नातेवाइकांनी त्याला जेवायला घातले. जेवण झाल्यानंतर तो शेजारी दुसऱ्या खोलीत झोपायला गेला.
दुपारी दीड वाजता त्याने पाच वर्षाच्या बालिकेला बोलावून घेत अत्याचार केले. हा प्रकार बालिकेच्या आईने बघितला. तिने तत्काळ सासऱ्यांना प्रकार सांगितला. यावेळी वादावादीचा प्रकार घडला. शेजारी आणि आसपासचे लोक जमा झाले. लोकांनी संशयिताला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस उपनिरीक्षक शैलजा पाटील तपास करत आहेत.
संशयित जाधवकडून गुन्ह्याची पुनरावृत्ती
पंधरा दिवसांपूर्वी प्रवीण जाधव हा आळतेमध्ये नातेवाइकांच्या घरी आला होता. त्यावेळी त्याने दुसऱ्या बालिकेसोबत असा अशोभनीय प्रकार केला होता. नातेवाईक असल्याने त्यावेळी प्रकरण वाढू नये म्हणून त्याला ताकीद देऊन सोडून दिले होते. पुन्हा त्याने तोच प्रकार केल्याने पोलिसांच्या हवाली केले.