पुणे-बेंगळुरु महामार्गावरील मांगुर फाटा येथे उड्डाणपूल होणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दर्शवली सहमती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 07:24 PM2024-02-02T19:24:44+5:302024-02-02T19:25:39+5:30
शरद पवार यांची शिष्टाई, सीमावासीयांच्या पाठपुराव्याला अखेर यश
दत्ताञय पाटील
म्हाकवे : पुणे-बेंगलोर महामार्गावरील वेदगंगा नदीनजीक मांगुर फाटयावर भरावाऐवजी पिलेरचा पुल व्हावा यासाठी सीमाभागातील शिष्टमंडळाने दिल्ली येथे केंद्रीय वाहतूक दळणवळण मंञी नितीन गडकरी यांची भेट घेतली.यावेळी सीमावासीयांच्या व्यथा ऐकून ना गडकरी यांनी मांगुर फाटा येथे पिलेरचा पुल उभारण्यासाठी सहमती दर्शवली.तसेच, तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी दुरध्वनीवरुन चर्चाही केली. यासाठी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी यशस्वी शिष्टाई केली. या चर्चेमुळे सीमावासीयांना दिलासा मिळाला आहे.
युवा नेते उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली वेदगंगा नदीकाठ बचाव कृती समितीचे के डी पाटील, चंद्रशेखर सावंत, अजित पाटील, दीपक पाटील, सुदीप वाळके, शिवाजी पाटील, अमोल पाटील, नानासाहेब पाटील, लक्ष्मीकांत पाटील, निरंजन पाटील यांनी ना.गडकरी यांची भेट घेतली. यावेळी मुरगुडचे नगरसेवक राजेखान जमादार उपस्थित होते.
राष्ट्रीय महामार्गावर मांगुर फाटा येथे सद्या भरावा टाकून पुलाचे काम सुरू आहे. हा भराव १२ फुटापेक्षा अधिक असल्यामुळे वेदगंगा नदीकाठच्या दोन्ही तिरावरील गावांना पुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे. यामध्ये कर्नाटकातील चार तर १८ गावांतील शेतीसह घरात पाणी शिरणार आहे. त्यामुळे याठिकाणी उड्डाणपूल व्हावा यासाठी सीमाभागातील शेतकऱ्यांसह नागरिक अनेक दिवसांपासून लढा देत आहेत. यासाठी काकासाहेब सावडकर (आणूर), धनंजय पाटील (म्हाकवे), दिगंबर अस्वले (मळगे),शिवाजी पाटील (बानगे), अमित पाटील (निढोरी) यासह अनेकजण परिश्रम घेत आहेत.
नेतेमंडळींचेही पाठबळ..
मांगुर फाटा येथे उड्डाणपूल व्हावा यासाठी ना. ज्योतिरादित्य सिंधिया, पालकमंत्री हसन मुश्रीफ, भाजपचे नेते समरजित घाटगे, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, खासदार आण्णासाहेब जोल्ले, आमदार निलेश लंके, आमदार शशिकला जोल्ले, माजी आमदार संजय घाटगे यांनीही सीमावासीयांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
शरद पवार यांच्या भेटीने कलाटणी..
१६ जानेवारी रोजी शरद पवार यांनी मांगुर फाटा येथे भेट दिली होती. शिष्टमंडळाने दिल्लीला यावे ना. गडकरी हे याबाबत निश्चित सकारात्मक विचार करतील असा विश्वासही त्यांनी दिला होता. पदरमोड करून सीमाभागातील शिष्टमंडळ विमानाने दिल्लीला गेले होते. ना.गडकरी यांनी अगदी व्यवस्थित चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतल्याने सीमावासीयात चैतन्य निर्माण झाले आहे.