कोल्हापुरात बनावट नोटा तयार करणारी टोळी गजाआड, साडेचार लाखांच्या नोटांसह साडे बारा लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 04:33 PM2023-01-21T16:33:42+5:302023-01-21T16:34:46+5:30
संशयितांनी कोट्यवधी रुपयांच्या बनावट नोटा बाजारात खपवल्याचा संशय
उद्धव गोडसे
कोल्हापूर : बनावट नोटा तयार करून त्या बाजारात खपवणा-या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आज, शनिवारी (दि. २१) अटक केली. चौघांच्या टोळीकडून ४ लाख ४५ हजार ९०० रुपयांच्या बनावट नोटांसह गुन्ह्यातील कार, प्रिंटर, संगणक, कागद असा १२ लाख ६२ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर मरळी फाटा येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शुक्रवारी (दि. २०) ही कारवाई केली.
बनावट नोटांसह काही संशयित कळे ते कोल्हापूर मार्गावर शुक्रवारी एका पांढ-या रंगाच्या कारमधून येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक शेषराज मोरे यांच्या पथकाने मरळी फाटा येथे पासळा रचून संशयित कार (एम.एच. ०९ डी.एक्स. ८८८८) अडवली. कारमधील संशयितांची अंगझडती घेताना त्यांच्याकडे बनावट नोटा आढळल्या.
कारमधील संशयित चंद्रशेखर बाळासाहेब पाटील (वय ३४, रा. कसबा तारळे, ता. राधानगरी), अभिजित राजेंंद्र पवार (४०, रा. गडमुडशिंगी, ता. करवीर), दिग्विजय कृष्णा पाटील (२८, रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) यांना तिघांना अटक केल्यानंतर संदीप बाळू कांबळे (वय ३८, रा. आंबेडकर नगर, कळे, ता. पन्हाळा) याला त्याच्या कळे येथील घरातून अटक करण्यात आली.
यातील संदीप कांबळे हा टोळीचा सूत्रधार असून, तो कळे येथे एका ई-सेवा केंद्रात कामाला होता. संशयितांनी कोट्यवधी रुपयांच्या बनावट नोटा बाजारात खपवल्या असाव्यात, असा संशय स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गोरले यांनी व्यक्त केला आहे.
या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक शेषराज मोरे यांच्यासह विजय गुरखे, वैभव पाटील, सचिन देसाई, अनिल पास्ते, हिंदुराव केसरे, श्रीकांत मोहिते, रणजित पाटील, दीपक घोरपडे, सोमराज पाटील, रफिक आवळकर, आदींनी सहभाग घेतला.