गाढ झोपेत असलेल्या माय-लेकीस नागाने केला दंश, चिमुकलीचा झाला मृत्यू; कोल्हापुरातील दुर्दैवी घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 04:27 PM2022-08-25T16:27:44+5:302022-08-25T16:28:19+5:30
काही तरी चावल्याची जाणीव झाली. उठून लाईट लावून पाहिले असता सहा ते सात फूट नाग अंथरुणावर फणा काढून उभा होता.
कोपार्डे : भामटे (ता.करवीर) येथे मंगळवारी रात्री घरात अंथरुणात झोपी गेलेल्या चिमुरडीला विषारी नागाने दंश केल्याने उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ज्ञानेश्वर सचिन यादव (वय ११) असे या मुलीचे नाव आहे. तिची आई नीलमलाही या नागाने दंश केला आहे; पण तिच्यावर कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी भामटे येथील सचिन यादव यांचे राहते घर देसाई गल्लीत आहे. आज रात्री सचिन, पत्नी नीलम, मुलगी ज्ञानेश्वर व मुलगा जेवण करून झोपी गेले होते. रात्री दीडच्या दरम्यान सचिन यांच्या पत्नी नीलम यांना हाताला काही तरी चावल्याची जाणीव झाली. त्यांनी उठून लाईट लावून पाहिले असता सहा ते सात फूट नाग अंथरुणावर फणा काढून उभा होता. नाग पाहून नीलम यांनी पती सचिन यांना जागे केले; पण तत्पूर्वी या नागाने नीलम यांच्या शेजारी झोपलेल्या ज्ञानेश्वरीला हातावर व पाठीवर कडाडून चावा घेतला होता; पण गाढ झोपी गेलेल्या ज्ञानेश्वरीला त्याची जाणीव झाली नाही.
आरडाओरडा झाल्याने शेजारीपाजारी सचिन यांच्या घराकडे धावले; पण नागाचा रुद्रावतार पाहून सर्वांनाच धक्का बसला. नागाने दंश केलेल्या नीलम व मुलगी ज्ञानेश्वरी यांना तातडीने कोल्हापूर येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना आज सायंकाळी पाच वाजता मुलगी ज्ञानेश्वरीचा मृत्यू झाला,तर आई नीलम हिची प्रकृती स्थिर आहे.