Crime News: पाहुणा म्हणून आला, अन् घरातील दागिन्यांवर मारला डल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 11:37 AM2022-08-02T11:37:13+5:302022-08-02T11:38:38+5:30
राजारामपुरी पोलिसांनी शिताफीने तपास करत अवघ्या दोन तासांतच चोरीचा उलगडा केला.
कोल्हापूर : पाहुणा म्हणून आला, घरातच राहिला अन् घरातील ६४ हजारांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, अशी स्थिती सुभाषनगरात घडली. याप्रकरणी पाहुणा म्हणून आलेला अरबाज लतीफ शेख (वय-२१, रा. विष्णू लक्ष्मीचाळ, सोलापूर) याला अटक केली. चोरीची तक्रार दाखल झाल्यानंतर राजारामपुरी पोलिसांनी शिताफीने तपास करत अवघ्या दोन तासांतच चोरीचा उलगडा केला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुभाषनगरातील बाळूमामा गल्लीत राणी ओमप्रकाश पाटील राहतात. रविवारी त्या कामास गेल्या होत्या. त्यावेळी घरी त्यांचा लहान मुलगा व भाचा असे घरी असताना अज्ञाताने चोरी करून घरातील सोन्याचे गंठण, मंगळसूत्र, चांदीचे दागिने, तसेच रोकड असा सुमारे ६४ हजार ४०० रुपयांचा ऐवज लंपास केला. याबाबत राणी पाटील यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली.
राजारामपुरी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी भेट देऊन कसोशीने चौकशी करत पाहुणा म्हणून घरी राहिलेला संशयित अरबाज लतीफ शेख याला गजाआड डांबले. त्याला ‘खाक्या’ दाखवताच त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून ६४ हजार ४०० रुपये किमतीचे चोरीचे दागिने व रोकड असा ऐवज हस्तगत केला.
ही कारवाई राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक ईश्वर ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील सहा. पो. नि. भगवान शिंदे, सहा. पो. नि. दीपिका जौंजाळ, पोलीस नितीन मेश्राम, विशाल शिरगावकर, प्रवीण पाटील, विशाल खराडे, संजय जाधव, रविकुमार आंबेकर, समीर शेख आदींनी केली.