काळम्मावाडीच्या उजव्या कालव्यात पडला गव्यांचा कळप, सरवडे-उंदरवाडी परिसरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 02:30 PM2022-02-26T14:30:19+5:302022-02-26T14:37:01+5:30
सध्या कालव्याला पाणी असल्याने हे सर्व गवे पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जात होते.
बोरवडे : काळम्मावाडीच्या उजव्या कालव्यात गवारेड्यांचा अख्खा कळप पडल्याची घटना आज सकाळी साडे सात सरवडे-उंदरवाडीच्या कॕनॉल परिसरात घडली. या कळपात तब्बल १७ गवे आहेत. सध्या कालव्याला पाणी असल्याने हे सर्व गवे पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जात होते. काही वेळाने हे गवे पाण्याबाहेर येत डोंगराकडे निघून गेले.
याबाबत घटनास्थळावरुन समजलेली माहिती अशी, सरवडे - उंदरवाडी दरम्यानच्या ठोमणदरा नावाच्या शेताजवळ सकाळी सातच्या सुमारास पाणी पिण्यासाठी आलेला गव्यांचा अख्खा कळपच पाण्यात पडला. सध्या कालव्याला पाणी सोडल्याने, पाण्याच्या प्रवाहाबरोबर हे सर्व गवे वाहत जात होते. कालव्याचे अस्तरीकरण न झालेल्या भागातून गवे बाहेर पडून जंगलाच्या दिशेने निघून गेले.
सकाळी शेताकडे जाणाऱ्या उंदरवाडीतील शेतकऱ्यांना कालव्याच्या पाण्यात पडलेले हे गवे दिसले. त्यांनी या गव्यांना सुमारे एक किमी अंतरावर असलेल्या लाकडी साकवापर्यंत हुसकावून नेले. या ठिकाणी अस्तरीकरण नसल्याने गव्यांना पाण्याबाहेर पडता आले. त्यानंतर हे गवे उंदरवाडीच्या भैरीच्या डोंगराकडे निघून गेले.
दरवर्षी उंदरवाडी ते सरवडे परिसरात गवे पाण्यात पडण्याच्या घटना वारंवार घडतात. या घटना टाळण्यासाठी येथे कायमस्वरुपी उपाययोजनांची आवश्यकता असल्याचे ग्रामस्थांनी मागणी केली.