कोल्हापुरात हिंदू-मुस्लिम भाई-भाईचे दर्शन! शाळेतल्या हिंदू मित्राने इकबालला दिला मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 10:57 AM2023-06-12T10:57:39+5:302023-06-12T10:58:48+5:30

कोल्हापुरातील डांगे गल्लीतील इकबाल तांबोळी यांचा कपबशीने भरलेला गाडा जमावाने बुधवारच्या दंगलीमध्ये उलथून टाकला होता.

A Hindu friend from school gave Iqbal a helping hand In Kolhapur | कोल्हापुरात हिंदू-मुस्लिम भाई-भाईचे दर्शन! शाळेतल्या हिंदू मित्राने इकबालला दिला मदतीचा हात

कोल्हापुरात हिंदू-मुस्लिम भाई-भाईचे दर्शन! शाळेतल्या हिंदू मित्राने इकबालला दिला मदतीचा हात

googlenewsNext

-मिलिंद यादव

इकबाल ! माझा शालेय मित्र. शालेय जीवन संपलं आणि जो-तो आपापल्या मार्गाला लागला. सांसारिक व्यापात प्रत्येकजण गुरफटून गेला. आज सारेच शालेय मित्र संपर्कात आहेत असं नाही. काही फोनवर, काही सोशल मीडियावर. पण, इकबाल मात्र बऱ्याच वेळा दिसायचा, तो रस्त्यावर. तो फेरीवाला झाला होता. जाता-येता कधीतरी आम्ही सामोरे यायचो. फार काही बोलणं व्हायचं नाही, पण... "कसा आहेस?' या माझ्या प्रश्नाला 'अरे, चाललंय बघ हे रोजचंच.' गाडीवर, आश्चर्य वाटावं अशा पद्धतीने रचलेल्या कपबश्यांकडे हात करत त्याचं उत्तर असायचं. या भेटीत लक्षात राहायचा तो त्याचा हसरा चेहरा आणि कसलाही गर्व नसलेली त्याची देहबोली.

काल सकाळी सकाळी चहा पीत असताना 'लोकमत'मध्ये छापून आलेले शहरातील दंगलीचे फोटो पाहात होतो. त्या अनेक फोटोंपैकी एका फोटोने माझे लक्ष विचलित झाले आणि चहात बुडवलेले बिस्कीट गळून पडले. तोंडातून एकच शब्द बाहेर पडला, 'इकबाल'!

गाडीवरील कपबश्यांच्या ढिगाऱ्यासह जमावाने गाडी कशी उलटी रस्त्यावर आपटली असेल याची जाणीव होत होती, तो फोटो पाहून. नक्की माहीत नाही; पण शाहूराजांच्या स्मृतीसाठी असेल. कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी दिलेल्या शिकवणुकीमुळे असेल.

मी त्याक्षणी ठरवले की, इकबालला भेटायचं. त्याचा हा हातगाडीवरचा संसार पुन्हा उभा करायचा. त्याच्या घरी गेलो. इकबाल घरी नव्हता. त्याचा नंबर घेऊन फोन केला, तर हा गाडी दुरुस्त करायला गेलेला. इकबालला, तो होता तिथे जाऊन भेटलो. मला वाटलं होतं हा साधासुधा माणूस या घटनेनं खचला असेल. त्यानं नेहमीच्या हास्यमुद्रेनं माझं स्वागत केलं. मी म्हटलं, 'दोस्ता, तुला काय लागणार आहे सांग. तुझी गाडी परत सुरू झाली पाहिजे.' यावर हसत, नेहमीप्रमाणे डोळे बारीक करत तो जे बोलला, त्यातून माणूस म्हणून आपणही काही शिकण्यासारखे आहे. "अरे, जाऊ दे रे.. डोक्याला हात लावून बसण्यात काय अर्थ आहे. तू आपलेपणानं आलास... बोललास.. खूप झालं. करतोय प्रयत्न. आधी गाडी सरळ करतो."

मला तर इकबालमध्येच देवदर्शन झालं. त्यानं तर नुकसान करणाऱ्यांना एका दमात माफ करून टाकलं. गंमत म्हणजे इकबालची गाडी एक आपलाच बांधव दुरुस्त करत होता. ज्याचा या घडलेल्या प्रकरणाशी काही संबंध नव्हता. त्याला हे मान्यच नसावं, हे त्या दोघांच्या संवादावरून लक्षात येत होतं. त्या दोघांचा धर्म एकच... 'राबणारा'.

संध्याकाळी त्याच्या घरी गेलो. मुद्दाम बायको व मुलीला घेऊन गेलो. त्याची कारणं दोन: १. त्या घरात आत्मविश्वास यावा. २. पानसरेंनी मला दिलेली विचारांची शिदोरी पुढच्या पिढीकडे, कोणत्याही प्रबोधनवर्गाशिवाय कृतीने जावी. डोक्यात आलेल्या रकमेचं पाकीट त्याच्या हातात दिलं. 'दोस्ता, आणि काय लागलं तर न लाजता हक्काने माग.' इकबाल म्हणाला, "अरे, नाही रे. तू आठवण ठेवून मदत केलीस हेच खूप झालं," मित्रांनो, समाजातील एकोपा, चांगुलपणा टिकवायचा असेल तर असेच करायला हवे. मी केले.. तुम्ही करा.. आपण करूया.....

Web Title: A Hindu friend from school gave Iqbal a helping hand In Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.