वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकला, कोल्हापुरातील एका हॉस्पिटलला ५० हजाराचा दंड
By भारत चव्हाण | Published: May 30, 2024 07:25 PM2024-05-30T19:25:28+5:302024-05-30T19:25:44+5:30
कोल्हापूर महापालिकेची कारवाई
कोल्हापूर : तपोवन मैदान जवळील ओम ऑर्थोपेडिक हॉस्पिटल प्रशासनाने त्यांच्या हॉस्पिटलमधील जैव वैद्यकीय कचरा तपोवन परिसरात उघड्यावर टाकल्याचे निर्दशनास आल्याने हॉस्पिटलला महापालिका आरोग्य घनकचरा विभागामार्फत ५० हजार रुपयांचा दंड करण्यात आला.
ही कारवाई सहायक आयुक्त कृष्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील विभागीय आरोग्य निरीक्षक ऋषिकेश सरनाईक, मुकादम राकेश पाटोळे व खलीद शेख यांनी केली.
महापालिकेमार्फत शहरातील सर्व वैद्यकीय व्यवसायिकांना जाहीर नोटीसद्वारे हॉस्पिटल, क्लिनिक व लॅबमधून निर्माण होणारा जैव वैद्यकीय कचरा इतरत्र कोठेही न टाकता महापालिकेच्या अधिकृत वाहनाकडेच देण्याबाबत आवाहन केले होते. यामध्ये आस्थापनेने जैव वैद्यकीय कचरा आजूबाजूच्या परिसरात टाकल्यास संबंधित आस्थापनेवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार कारवाई करण्यात येईल, अशा सुचना दिल्या होत्या.
गुरुवारी ओम ऑर्थोपेडिक हॉस्पिटल यांनी त्यांचे आस्थापनेमधील जैव वैद्यकीय कचरा तपोवन परिसरामध्ये टाकल्याचे निर्दशनास आले. त्यामुळे त्यांना रु.५० हजाराचा दंड करण्यात आला.