गणेशमूर्ती खाली घेताना झोपाळ्याची तार तुटली, चौथ्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; कोल्हापुरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 02:05 PM2024-03-30T14:05:44+5:302024-03-30T14:09:12+5:30
कुटुबांतील कर्ता गेला..
कोल्हापूर : इमारतीच्या चौथ्या मजल्यावर टेरेसवर सुकविण्यासाठी ठेवलेल्या गणेशमूर्ती झोपाळ्यावरून खाली घेत असताना झोपाळ्याची तार तुटून दोघे कामगार खाली पडले. यातील भगवान नामदेव कांबळे (वय ४८, रा. विक्रमनगर, मूळ गाव पासार्डे, ता. करवीर) याचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा दुसरा सहकारी गंभीर जखमी झाला असून त्याला राजारामपुरीतील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. बापट कॅम्प, संत गोरा कुंभार वसाहतीत शुक्रवारी दुपारी एक वाजता ही घटना घडली.
घटनास्थळावरुन आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बापट कॅम्प परिसरातील मूर्तिकार बाजीराव कुंभार हे १५ फुटांहून अधिक मोठ्या गणेशमूर्ती तयार करून ते इमारतीच्या चौथ्या मजल्यावर सुकवितात. मूर्ती पूर्णपणे सुकविल्यानंतर मोठ्या झोपाळ्याच्या साहाय्याने खाली आणून ठेवल्या जातात आणि त्यानंतर रंगरंगोटी केली जाते. मूर्तिकार कुंभार यांच्याकडे कामाला असलेला कामगार भगवान कांबळे गुहागरच्या कामगाराला घेऊन चौथ्या मजल्यावरून या मूर्ती झोपाळ्यावरून खाली घेत होता. या वेळी झोपाळ्याचा दोर अचानक तुटला आणि क्षणार्धात कांबळे आणि त्याचा सहकारी जमिनीवर कोसळला. घडलेल्या घटनेने परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले.
सुमारे चाळीस फूट अंतरावरून कोसळल्याने कांबळे याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला. या दोघांना परिसरातील नागरिकांनी दोघांना तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच भगवान कांबळे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दुसऱ्या जखमीला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सीपीआरमध्ये कांबळे यांच्या नातेवाइकांची आणि बापट कॅम्प परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली.
कुटुबांतील कर्ता गेला..
मृत भगवान कांबळे पासार्डे (ता. करवीर)चे काही वर्षांपूर्वी त्याने कष्टाने विक्रमनगर परिसरात घर खरेदी केले होते. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि तीन भाऊ असा परिवार आहे. घरच्या कर्ता पुरुषाच्या मृत्यूमुळे त्यांच्या पत्नीने सीपीआरच्या आवारात केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
मुलांचे शिक्षण अर्धवटच
भगवान कांबळे पडेल ते काम करत होते. त्यांची एक मुलगी दहावीत शिकत असून मुलगा पहिलीत आहे. त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. त्यांना भजनाचा छंद होता. ते साई भजनी मंडळात आपली सेवा बजावित होते.