खासगी, जंगल क्षेत्रातील वणव्याचा झालायं वणवाच; जैवविविधता, काजू-आंब्याच्या बागा होरपळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 13:49 IST2023-03-10T13:48:36+5:302023-03-10T13:49:04+5:30

काजू व आंब्याच्या उत्पन्नावर शेतकऱ्यांनी पाहिलेली स्वप्ने उध्वस्त

A large amount of biodiversity is destroyed in forest fires | खासगी, जंगल क्षेत्रातील वणव्याचा झालायं वणवाच; जैवविविधता, काजू-आंब्याच्या बागा होरपळल्या

खासगी, जंगल क्षेत्रातील वणव्याचा झालायं वणवाच; जैवविविधता, काजू-आंब्याच्या बागा होरपळल्या

सदाशिव मोरे

आजरा : आजरा परिसरात होळीच्या पार्श्वभूमीवर खासगी जमिनीसह जंगल परिसरात लागलेल्या वणव्यात मोठ्या प्रमाणात जैवविविधता नष्ट झाली आहे. वणव्यात हजारो  स्थानिक प्रजातीच्या झाडांसह काजू व आंब्याच्या बागा होरपळल्या आहेत. वाढल्यामुळे काजू व आंब्याच्या उत्पन्नावर शेतकऱ्यांनी पाहिलेली स्वप्ने जमीनदोस्त झाली आहेत.

गेल्या आठ दिवसापासून आजरा तालुक्यात सुरू असलेला वणवा अद्याप संपलेला नाही. दररोज खाजगी जमिनीसह जंगल क्षेत्राला आग लागलेलीच आहे. दुपारच्या वेळात लागलेली आग विझविण्यासाठी शेतकऱ्यांसह वन कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. मात्र उन्हाचा तडाका व जोरदार वाऱ्यामुळे क्षणात आग सर्वत्र पसरत आहे. आगीचे लोट ३० ते ३५  फूट उंचीवर जात आहेत. त्यामुळे आग विझवण्यातही अडचणी येत आहे.

वणव्यामुळे सरपटणारे प्राणी, लहानपक्षी व त्यांची घरटी जळून जात आहेत. निसर्ग सौंदर्याने नटलेला व मुबलक जैवविविधता असलेल्या आजऱ्यातील जैवविविधता नष्ट होत आहे. वन विभागाच्यावतीने जंगलांना आग लागू नये म्हणून जाळ रेषा काढली आहे मात्र या जाळ रेषेच्या आतमध्येही जंगलांना आग लागली आहे. सोहळे, वझरे, मडिलगे, सुलगाव, चांदेवाडी, लाटगांव, चित्री धरण परिसरात जंगलांसह खासगी क्षेत्रात लागलेला वणवा आटोक्यात आणण्यात अडचणी येत आहेत. गेल्या आठ दिवसापासून होळीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात सर्वत्रच वणवे लागल्यामुळे शेतकऱ्यांसह वन विभागाला या वणव्यांचा वणवा झाला आहे.

वणव्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न

सर्वत्र वणवे लागल्यामुळे जनावरांचे गवत व पिंजर जळून खाक झाले आहे. वर्षभरासाठी लागणारे गवत व पिंजर साठवून ठेवलेले आहे. मात्र गवतालाच वणवे लागल्यामुळे जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.

पिकांच्या उत्पन्नावर पाहिलेली स्वप्ने उध्वस्त

काजू व आंब्याच्या बागांना पोषक वातावरणामुळे चांगला मोहोर आला होता. मात्र वणव्यामुळे अनेक ठिकाणच्या काजू व आंब्याच्या बागा जळाल्या आहेत. त्यामुळे काजू व आंब्याच्या उत्पन्नावर शेतकऱ्यांनी पाहिलेली स्वप्ने चालू वर्षी उध्वस्त झाली आहेत.

Web Title: A large amount of biodiversity is destroyed in forest fires

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.