अंबाबाईच्या नगर प्रदक्षिणेस भक्तांचा महापूर, एकवीस फुटी प्रतिकृती लक्षवेधी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 01:50 PM2022-10-04T13:50:26+5:302022-10-04T14:27:31+5:30

सारा नगरप्रदक्षिणा मार्ग फुलांच्या पायघड्या आणि विविधरंगी रांगोळ्यांनी सजला होता.

A large crowd of devotees attend the Nagarpradakshina ceremony of Ambabai | अंबाबाईच्या नगर प्रदक्षिणेस भक्तांचा महापूर, एकवीस फुटी प्रतिकृती लक्षवेधी

छाया : आदित्य वेल्हाळ

googlenewsNext

कोल्हापूर : भाविकांची प्रचंड गर्दी, ‘अंबा माता की जय'चा अखंड जयघोष, पोलीस बँडच्या सुरांसह विविधरंगी विद्युत झोतांच्या साक्षीने सोमवारी रात्री साडेनऊ वाजता अंबाबाई मंदिरात अंबाबाईचा नगरप्रदक्षिणा सोहळा पार पडला. यानिमित्ताने सारा नगरप्रदक्षिणा मार्ग फुलांच्या पायघड्या आणि विविधरंगी रांगोळ्यांनी सजला होता. न्यू गुजरी मित्र मंडळाने गुजरी कॉर्नर येथे उभारलेल्या विविधरंगी फुलांतील एकवीस फुटी अंबाबाईची प्रतिकृती पाहण्यासाठीही भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नऊच्या सुमारास अंबाबाईच्या वाहनाचे पूजन झाले आणि रात्री साडेनऊच्या सुमारास नगरप्रदक्षिणेला प्रारंभ झाला. महाद्वार, गुजरी, भाऊसिंगजी रोड, भवानी मंडप, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर या पारंपरिक मार्गावरून जाताना हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. पुष्पवृष्टीही केली. तुळजाभवानी मंदिरात पान विडा देऊन स्वागत झाले.

यावेळी याद्नसेनीराजे छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, संयोगीताराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती होती. नगर प्रदक्षिणेनंतर देवी मंदिरात विराजमान होताच मंदिराचे चारही मुख्य दरवाजे बंद झाले आणि विविध धार्मिक विधींना प्रारंभ झाला. पालखी सोहळ्यानंतर रात्री उशिरा अंबाबाई मंदिरात जागर अन् त्यानंतर होमहवन झाले.

फुलांची प्रतिकृती

महाद्वार रोडवर नगर प्रदक्षिणा मार्गावर गुजरी येथे १६ फूट बाय २१ फूट उंचीची अंबाबाईच्या मुखकमलाची फुलांची प्रतिकृती साकारली होती. त्यावर विद्युत रोषणाई केल्याने ही प्रतिकृती पाहण्यासाठी गर्दी झाली होती. त्यासाठी वेगवेगळ्या रंगाची आर्टिफिशियल अन् स्थानिक हजारो फुले वापरली आहेत. कोल्हापुरातील २५ कलाकारांच्या पथकाने ती साकारली होती.

महाद्वार, जोतिबा रोडवर ढोलपथकांकडून स्वागत

प्रदक्षिणा मार्गावर महाद्वार जगदंबा ढोल ताशा पथकाने आणि करवीर नाद पथकाने देवीच्या पालखीचे स्वागत केले. गुरू महाराज वाड्यापासून बिनखांबी गणेश मंदिर ते महाद्वारापर्यंत रांगोळ्या काढल्या होत्या. ठिकठिकाणी देवीच्या पालखीचे पूजन करण्यात आले.

Web Title: A large crowd of devotees attend the Nagarpradakshina ceremony of Ambabai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.