कोल्हापूरात शिवजयंती मिरवणूकीत पारंपारिक वाद्यांच्या ठेक्याबरोबर लेसर शो; सजवलेल्या रिक्षा, वीस घोडेस्वार सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 10:34 PM2023-04-22T22:34:51+5:302023-04-22T22:37:58+5:30
परिसरातील १२५ तरुण मंडळांचा यात सहभाग होता.
कोल्हापूर : जय शिवाजी, जय भवानीचा गजर, लाठी काठी, मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांसोबत ढोल, हलगी, महिलांचे लेझिम अशा पारंपरिक वाद्यांच्या जोडीला लेसर शो आणि आधुनिक वाद्यांच्या गजरात शनिवारी सायंकाळी संयुक्त राजारामपुरीची शिवजयंतीची मिरवणूक चार तास चालली. परिसरातील १२५ तरुण मंडळांचा यात सहभाग होता.
शाहू महाराज यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या मिरवणुकीस प्रारंभ झाला. यावेळी आमदार जयश्री जाधव, , मालोजीराजे, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, मयूर दूध संघाचे संजय पाटील, पृथ्वीराज पाटील उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष अनुप पाटील, उपाध्यक्ष संग्रामसिंग निंबाळकर, खजानिस किशोर खानविलकर, सचिव विघ्नेश आरते, काका जाधव, कमलाकर जगदाळे, दुर्गेश लिंग्रस, अभिजित शिंदे आदींनी मिरवणुकीचे नियोजन केले.
राजमाता जिजाऊ, येसूबाईंच्या वेशभूषेतील कलाकार, अश्वारुढ ११ फुटी शिवमुर्ती, शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, येसूबाई यांच्या वेशभूषेतील कलाकार, घोडेस्वार, मावळे, मर्दानी खेळ, तोफा, लेझीम पथक, करवीर गर्जना ढोल पथक आणि आकर्षक लाईट ॲन्ड साउंड सिस्टीम या मिरवणुकीचे आकर्षण ठरले.
दहा रिक्षा आणि वीस घोडेस्वार सहभागी -
मिरवणुकीत सजवलेल्या दहा रिक्षा आणि वीस घोडेस्वार सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. शिवाजी महाराज शाहिस्तेखानाची बोटे तोडतानाचा सजीव देखावा अग्रभागी होता. ही मिरवणुक सायबर चौक, माउलीचा पुतळा, श्रीराम विदयालय, जनता बझार, मेन रोड मार्गे निघून राजारामपुरी तालमीजवळील भव्य व्यासपीठाजवळ विसर्जित झाली.