kolhapur: घुंगूर येथे ताटातूट झालेल्या बिबट्या अन् पिल्लाची झाली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 01:02 PM2024-01-09T13:02:26+5:302024-01-09T13:02:57+5:30
करंजफेण : शाहुवाडी तालुक्यातील घुंगूर गावच्या हद्दीत सोमवारी सकाळच्या दरम्यान बिबट्याची मादी अन् बिबट्याच्या पिल्लाचे नागरिकांना दर्शन झाले. नागरिकांच्या ...
करंजफेण : शाहुवाडी तालुक्यातील घुंगूर गावच्या हद्दीत सोमवारी सकाळच्या दरम्यान बिबट्याची मादी अन् बिबट्याच्या पिल्लाचे नागरिकांना दर्शन झाले. नागरिकांच्या भीतीने बिबट्याची मादी जंगलात पळाल्याने मागोमाग असलेले तीन महिन्यांचे पिल्लू बिथरून जवळच असलेल्या झुडपात लपून बसले. नागरिकांनी घटनेची माहिती वनविभागाला देताच कर्मचाऱ्यांनी पिल्लाला ताब्यात घेतले. अन् बिबट्या अन् पिल्लाची भेट घडवून दिली.
आठ दिवसांपूर्वी घुंगूर गावाजवळील बांदिवडे गावात बिबट्याने दोन वेळा प्रवेश करून घरात घुसण्याचा प्रयत्न केला होता. नागरिकांनी वनविभागाला बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी केली होती. दरम्यान सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घुंगूरवाडीतील काही युवक पहाटेच्या दरम्यान फिरायला गेल्यावर शाळेजवळील रस्त्यावरून बिबट्याची मादी पिल्लांच्यासोबत जात असल्याचे दिसून आले. बिबट्याच्या मादीला नागरिकांचा सुगावा लागल्याने मादीने जवळच असलेल्या जंगलात धूम ठोकली. मात्र बिबट्याचे पिल्लू मागे राहिल्याने रस्त्याच्या शेजारी असलेल्या झुडपात पिल्लू बसले.
स्थानिक नागरिकांनी बिबट्याचे पिल्लू असल्याची माहिती वनरक्षक अतुल कदम यांना देताच कदम यांनी तातडीने घटनास्थळी येऊन सहकाऱ्यांच्या मदतीने बिबट्याचे पिल्लू ताब्यात घेऊन लोखंडी सापळ्यात सुरक्षित ठेवले आहे. तीन महिने वयाचे हे होते. पिल्लाला सापडलेल्या परिसरात रात्री सुरक्षित ठेवण्यात आले. यानंतर माती बिबट्या पिल्लास घेवून गेली. यावेळी परिसरात चार कॅमेरे लावण्यात आले होते. यावेळी वनपाल राजाराम रसाळ, वनरक्षक अतुल कदम वनसेवक दिनकर पाटील, महेश पाटील, नामदेव पाटील, सुरेश बुक्कम, स्वप्नाली जाधव उपस्थित होते.