समुहाने व्यवसाय करा, ५० लाखांचे कर्ज मिळवा; अण्णासाहेब पाटील महामंडळाची योजना
By पोपट केशव पवार | Published: December 2, 2023 11:52 AM2023-12-02T11:52:32+5:302023-12-02T11:53:28+5:30
शिक्षणासाठीही मिळणार कर्ज, व्याजपरतावा
पोपट पवार
कोल्हापूर : मराठा समाजाच्या युवकांना उद्यमी बनवण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने वैयक्तिक कर्जयोजनेशिवाय आता समूह, गटाने व्यवसाय करणाऱ्यांनाही बळ देण्याचा निर्णय घेतला आहे. समुहाने उद्योग, व्यवसाय उभारणाऱ्या गटाला आता सात वर्षांच्या मुदतीत ५० लाख रुपयांचे कर्ज देण्यात येणार आहे.
याचा व्याजपरतावाही सरकारच भरणार आहे. याबाबत राज्य सरकारने प्रस्ताव तयार केला असून, यावर शिक्कामोर्तब करणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी 'लोकमत'शी बोलताना दिली.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून सध्या उद्योग, व्यवसाय उभारण्यासाठी १५ लाख रुपयांपर्यंतच वैयक्तिक कर्ज देण्यात येते. याचा व्याज परतावा राज्य सरकारकडून देण्यात येतो. सरकारच्या या योजनेचा राज्यातील ७१ हजारांहून अधिक युवकांनी लाभ घेतला आहे. मात्र, ज्यांची वैयक्तिक इतके मोठे प्रकल्प, व्यवसाय उभे करण्याची क्षमता नाही, अशांसाठी समुहाने व्यवसाय उभे करण्याची संधी राज्य सरकार देणार आहे.
त्यासाठी सात वर्षांच्या परतफेडीच्या मुदतीत ५० लाख रुपयांचे कर्ज देण्यात येणार आहे. संबंधित समुहाने, गटाने या कर्जाची नियमित परतफेड केल्यास त्यांचे कर्जावरील सात वर्षांचे व्याज राज्य सरकार देणार आहे. याबाबत सरकारने धोरण तयार केले असून, लवरकच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
शिक्षणासाठीही मिळणार कर्ज, व्याजपरतावा
अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून आतापर्यंत केवळ व्यवसायासाठी कर्ज, व्याजपरतावा दिला जात होता. मात्र, आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठीही यातून कर्ज, व्याजपरतावा दिला जाणार असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
गटप्रकल्पाला ५ वर्षांची मुदत
महामंडळाकडून सध्या गटप्रकल्प व्याजपरतावा योजना सुरू आहे. याची मुदत ५ वर्षांची आहे. पाच वर्षांपर्यंतचे व्याज महामंडळाकडून दिले जाते. इतकी मोठी रक्कम पाच वर्षांत फेडणे अनेकांना शक्य नसते. त्यामुळे त्यापुढील व्याज लाभार्थ्यांना भरावे लागत होते. परिणामी, अनेकजण या योजनेकडे पाठ फिरवत होते. आता हेच व्याज सात वर्षांपर्यंत महामंडळ भरणार आहे. म्हणजे, एखाद्या बँकेचे वार्षिक १२ टक्क्याने कर्ज घेतले असेल तर त्याची सात वर्षांपर्यतची व्याजाची रक्कम ही ३० लाखांपर्यंत होते. इतकी रक्कम महांडमळ भरणार आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे ग्रूप, गटाने व्यवसाय, उद्योग उभा करणाऱ्यांना ५० लाख रुपयांचे कर्ज देण्यात येणार आहे. याचा सात वर्षांपर्यतचा व्याजपरतावा महामंडळातर्फे देण्यात येणार आहे. या निर्णयावर लवकरच शिक्कामोर्तब करणार आहे. महामंडळातर्फे शैक्षणिक कर्ज देण्यासाठीही सरकार विचाराधीन आहे. -चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री