संजय मंडलिक यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची बैठक, पराभवाचे चिंतन; नेत्यांना भेटण्यासाठी जाणार मुंबईला
By समीर देशपांडे | Published: June 5, 2024 03:33 PM2024-06-05T15:33:54+5:302024-06-05T15:34:16+5:30
कोल्हापूर : पराभवाच्या दुसऱ्याच दिवशी बुधवारी सकाळी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी ...
कोल्हापूर : पराभवाच्या दुसऱ्याच दिवशी बुधवारी सकाळी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी पराभवाच्या कारणांबाबत प्राथमिक चर्चा झाली असून सर्व नेत्यांचे आणि मतदारांचे आभार मानण्यात आले. तसेच मुंबईला जावून प्रमुख नेत्यांना भेटण्याचा निर्णयही घेण्यात आला.
मंगळवारीच पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार धनंजय महाडिक यांनी मंडलिक यांची भेट घेतली होती. यावेळी दुसऱ्याच दिवशी महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या प्रमुखांना बोलावण्याची सुचना मुश्रीफ यांनी केली होती. त्यानुसार मंडलिक यांच्याकडून निरोप गेले आणि त्यांच्याच निवासस्थानी ही बैठक झाली.
बैठकीनंतर खासदार धनंजय महाडिक म्हणाले, देशभरातच काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागले आहेत. १९ मंत्री पराभूत झाले. मराठा आंदोलन, जिल्ह्यातून जाणारा शक्तीमार्ग तसेच विरोधी उमेदवार शाहू छत्रपती यांच्याविषयी असलेला जनतेतील आदर अशा अनेक कारणांमुळे हा पराभव झाला.
संजय मंडलिक म्हणाले, सर्वच नेत्यांनी चांगले काम केले आहे. कागल आणि चंदगडमधून अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही ही वस्तुस्थिती आहे. प्रचारादरम्यान मी काही चुकीेचे बोललो असे मला वाटत नाही. यापुढच्या काळातही महायुती म्हणून काम करू, आत्मपरीक्षण करून सुधारणा करू. या बैठकीला मुश्रीफ, आमदार प्रकाश आबिटकर, राजेश पाटील, अशोक चराटी, विजय जाधव, राजेखान जमादार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.