देशभरातील वैदूंचे कोल्हापुरातील कणेरी मठावर होणार संमेलन, आयुर्वेदिक ज्ञानाच्या प्रसारासाठी नव्याने नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 04:12 PM2023-02-14T16:12:42+5:302023-02-14T16:13:02+5:30

देशाच्या कानाकोपऱ्यातून चार हजारांवर वैदू येथे उपस्थित राहणार

A meeting of Vaidyas from all over the country will be held at Kaneri Math in Kolhapur | देशभरातील वैदूंचे कोल्हापुरातील कणेरी मठावर होणार संमेलन, आयुर्वेदिक ज्ञानाच्या प्रसारासाठी नव्याने नियोजन

देशभरातील वैदूंचे कोल्हापुरातील कणेरी मठावर होणार संमेलन, आयुर्वेदिक ज्ञानाच्या प्रसारासाठी नव्याने नियोजन

googlenewsNext

कोल्हापूर : विविध आजारांवर आयुर्वेदाच्या माध्यमातून उपचार करणारे देशभरातील वैदू सुमंगलम लोकोत्सवाच्या निमित्ताने कणेरी मठावर एकत्र येत आहेत. आरोग्य सुधारण्याबरोबरच उपचारासाठी आयुर्वेदाचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने या संमेलनात विशेष नियोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून चार हजारांवर वैदू येथे उपस्थित राहणार आहेत. मठावरील सुमंगल महोत्सव १९ पासून सुरू होत आहे.

भारतातील आयुर्वेदिक उपचार पद्धती जगभर प्रसिद्ध आहे. आयुर्वेदाला सुमारे ३००० वर्षांपासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा आहे. त्याच्या उपचार पद्धतींमध्ये वनौषधी, वनस्पतीजन्य औषधी, आहारविषयक नियम, व्यायामाचे विविध प्रकार आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर दिला जातो. आजही गावागावात पारंपरिक पद्धतीने उपचार करणारे वैदू आहेत. अतिशय दुर्धर रोगही बरा करण्याचा ते केवळ दावा करत नाहीत, तर रुग्ण बराही करतात. परंतु कागदोपत्री याचे पुरावे अथवा दस्तऐवजीकरण नसल्याने प्रचार आणि प्रसारावर मर्यादा येतात.

कोणत्या रोगासाठी कोणत्या वनस्पतीचे औषध वापरता येईल, त्याचे प्रमाण काय असेल, ते वापरण्याची पद्धत काय, ते कुठे मिळेल, अशा अनेक गोष्टी त्यांच्याकडे लिखित स्वरूपात नसतात. वैदूंना त्याचे ज्ञान असते, पण त्यांच्याकडे पदवी नसते. केवळ पारंपरिक ज्ञानावर आधारित ते उपचार करतात. सध्या गोवा आणि महाराष्ट्रामध्ये वैदूंची संघटना आहे. पण देशपातळीवर त्यांची व्यापक संघटना नाही. तशी संघटना करून देशभर या आयुर्वेदाचा प्रसार करण्याचा निर्धार कणेरी मठावरील या तीन दिवसीय वैदू संमेलनात करण्यात येणार आहे. काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली वनस्पती तज्ज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर व डॉ. अशोक वाली हे या संमेलनासाठी समन्वयाची जबाबदारी सांभाळत आहेत.

सध्या बाजारात विविध रोगांवर जी औषधे मिळतात, ती अतिशय महागडी आहेत. सर्वसामान्यांना ती न परवडणारी आहेत. अशावेळी भारतीय आयुर्वेदिक औषधांचा प्रचार आणि प्रसार व्हावा, यासाठी वैदूंचे हे संमेलन घेण्यात येत आहे. या निमित्ताने देशभरातील वैदूंचे संघटन करण्यात येणार आहे. - डॉ. मधुकर बाचूळकर, वनस्पती तज्ज्ञ
 

Web Title: A meeting of Vaidyas from all over the country will be held at Kaneri Math in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.