Kolhapur: सुळकुड योजनेसाठी एकमत करा; इचलकरंजीच्या प्रलंबित प्रश्नांवर मुंबईत पार पडली बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 12:35 PM2024-08-16T12:35:17+5:302024-08-16T12:36:06+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या सूचना
इचलकरंजी : इचलकरंजीसाठी दूधगंगा योजना मंजूर आहे. मात्र, त्याला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालाचे अवलोकन नगरविकास विभागाचे प्रधान सचिव गोविंदराज यांनी करून मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत निर्णयासाठी कार्यवाही करावी. तसेच पालकमंत्री हसन मुश्रीफ व आमदार प्रकाश आवाडे यांनी एकमतासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
सुळकूड पाणी योजनेसह मिळकतीला लागलेली शास्ती, झोपडपट्टी पुनर्वसन, यंत्रमाग व सायझिंग व्यवसायाला व्याज सवलत, आदी विषयांवर उपमुख्यमंत्री पवार यांच्या दालनात बुधवारी बैठक झाली. यावेळी वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री मुश्रीफ, आमदार आवाडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे उपस्थित होते.
बैठकीत शहरातील प्रलंबित प्रश्नांसंदर्भात उचित कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या. यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कामगार कल्याणकारी मंडळाचा प्रश्नही मार्गी लावण्याची ग्वाही त्यांनी दिली. सन १९७३ साली अस्तित्वात आलेल्या नगररचना विभागातील मिळकतींना क-१ शेरा पडला आहे. या मिळकतधारकांना बांधकाम परवाना मिळत नसल्याने त्यांना संयुक्त कराच्या दुप्पट दराने शास्ती लागली असून, ती थकबाकी सुमारे ४६ कोटी आहे.
त्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या धर्तीवर ही शास्ती माफ करण्यासाठी कॅबिनेटसमोर हा प्रस्ताव ठेवावा. इचलकरंजी शहरात २४ घोषित झोपडपट्टी असून, तीन हजार ७६४ इतके झोपडपट्टीधारक आहेत. यापूर्वी झालेले पुनर्वसन वगळून इतर सर्व झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव मान्यतेसाठी शासनाकडे सादर करा.
साध्या यंत्रमागधारकांना त्यांच्या कर्जावर पाच टक्के व स्वयंचलित यंत्रमागधारकांना त्यांच्या कर्जावर दोन टक्के याप्रमाणे व्याजाची सवलत देण्यासाठी आवश्यक रकमेची माहिती घेऊन प्रस्ताव सादर करण्याचे आदेश वस्त्रोद्योग सचिव यांना दिले.
राज्यातील सायझिंग-वार्पिंग उद्योगाकरिता पाच टक्के व्याज अनुदान दिल्यास शासनावर किती भर पडतो, याची माहिती घ्यावी. यंत्रमाग व यंत्रमाग व्यवसायाशी संबंधित सर्व कामगारांना लाभ देण्यासाठी सुतावर एक टक्का सेस लावण्याची आणि स्वतंत्र कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्याची मागणी चोपडे यांनी केली. कामगार विभागाने हा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे सादर केल्यास त्यास तत्काळ मान्यता दिली जाईल, असे आश्वासन पवार यांनी दिले. यंत्रमागधारकांना १५ मार्च २०२४ पासून मागील प्रभावाने वीज सवलत देण्यात येईल.
यावेळी खासदार धैर्यशील माने, अमित गाताडे, तौफिक मुजावर, चंद्रकांत पाटील, प्रकाश गौड, रफिक खानापुरे, पांडुरंग धोंडूपुडे, प्रल्हाद शिंदे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, इचलकरंजी आयुक्त ओमप्रकाश दिवटे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हे व्हीसीद्वारे उपस्थित होते.