हाती नोकरीची ऑर्डर, अन् वडिलांच्या मृत्यूचा मेसेज; कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सीईओंकडून माणुसकीचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 12:00 PM2024-06-28T12:00:07+5:302024-06-28T12:03:00+5:30
नियुक्तीची पर्यायी व्यवस्था
कोल्हापूर : त्याची प्राथमिक शिक्षक म्हणून निवड झाली होती. त्याला शाळा आणि गाव मिळणार म्हणून आनंदातच तो कोल्हापुरात आला. जिल्हा परिषदेची ही समुपदेशन प्रक्रिया शासकीय विश्रामगृहावर सुरू असल्याने तिथे तो मित्रांसह पोहोचला. प्रक्रिया सुरू झाली इतक्यात दुपारी वडील वारल्याचा निरोप त्याला मोबाइलवर मिळाला. एकीकडे काही वेळात हातात नोकरीची ऑर्डर पडणार होती आणि दुसरीकडे वडील वारले होते. ही बाब मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांना समजली. ते बाहेर आले आणि त्यांनी त्याच्या पाठीवर हात ठेवून जवळ घेतले. मग मात्र त्याला गहिवरून आले आणि त्याने आपल्या अश्रूंना वाट करून दिली.
जुन्नर येथील हरिभाऊ दिंगबर विरणक याच्या बाबतीत गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास हा प्रकार घडला. हरिभाऊ याला वडील गेल्याचे समजले. परंतु शिक्षक म्हणून गाव आणि शाळा मिळण्याची प्रक्रिया सुरू असताना हेे आता कुणाला सांगायचं, या अस्वस्थेत तो होता. अर्ध्या तासाने त्याने बाहेर नोंदणीसाठी बसलेल्या शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांना ही बातमी सांगितली. या कर्मचाऱ्यांनी चिठ्ठीवर नाव आणि घटना लिहून ही चिठ्ठी कार्तिकेयन यांना पाठवली.
कार्तिकेयन लगेचच बाहेर आले आणि या शिक्षकाजवळ गेले. त्यांना येताना पाहूनच हरिभाऊ ओक्साबोक्शी रडू लागला. कार्तिकेयन यांनी त्याला जवळ घेतले आणि त्याचे सांत्वन केले. इतकेच नव्हे तर त्याला एका अधिकाऱ्यांच्या वाहनातून बसस्थानकावर सोडून येण्यास सांगितले. तसेच इकडची काळजी करू नको, असेही सांगूनही त्याला दिलासा दिला. कर्तिकेयन यांच्या या संवेदेशनशील स्वभावाचा अनुभव येथील उपस्थितांना आला.
त्याच्या नियुक्तीची पर्यायी व्यवस्था
हा मुलगा गेल्यानंतर त्यांच्या पाठीमागच्या शिक्षकाला त्याच्या जागी उभारून प्रक्रिया पूर्ण करून त्याचे नियुक्तीपत्र घेण्यास कार्तिकेयन यांनी सांगितले आणि नियुक्तीपत्रही दिले. पाठीमागचा मुलगा हरिभाऊ याच्या शेजारच्या गावचाच असल्याने त्याला नियुक्तीपत्र पोहोच करण्यास सांगण्यात आले.