दरमहा नऊ हजार रुपये किमान पेन्शन द्यावी, शाहू छत्रपती यांची लोकसभेत मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 04:49 PM2024-08-07T16:49:35+5:302024-08-07T16:50:37+5:30

भविष्यासाठी महागाई निर्देशांकाशी जोडावी

A minimum pension of nine thousand rupees per month should be paid MP Shahu Chhatrapati demand in Lok Sabha | दरमहा नऊ हजार रुपये किमान पेन्शन द्यावी, शाहू छत्रपती यांची लोकसभेत मागणी

दरमहा नऊ हजार रुपये किमान पेन्शन द्यावी, शाहू छत्रपती यांची लोकसभेत मागणी

कोल्हापूर : ईपीएस ९५ अंतर्गत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना किमान निवृत्तिवेतन दरमहा नऊ हजार रुपयांपर्यंत वाढवून भविष्यासाठी महागाई निर्देशांकाशी जोडले जावे, अशी आग्रही मागणी खासदार शाहू छत्रपती यांनी मंगळवारी लोकसभेत केली. पेन्शन महागाईपासून संरक्षित नाही, शिवाय गेल्या दहा वर्षांत त्यात एक रुपयाचीही वाढ झालेली नाही, याकडेही सभाध्यक्षांचे लक्ष वेधण्यात आले.

ईपीएस ९५ योजनेशी देशभरातील ७५ लाख निवृत्तिवेतनधारक संबंधित आहेत. पेन्शनधारकांची दयनीय अवस्था आहे. त्यांना किमान १४५१ रुपये इतके तुटपुंजे निवृत्तिवेतन दिले जात आहे. घरगुती गॅस सिलिंडरची किंमत १२०० रुपये आहे. अशा परिस्थितीत सरासरी १४५१ रुपयांमध्ये जगायचे कसे, असा सवाल शाहू छत्रपती यांनी उपस्थित केला.

आकडेवारी सांगते की "पेन्शन-फंड"मधील कॉर्पस् वाढला आहे. २०१७-१८ मध्ये तीन लाख ९३ हजार कोटी वरून २०२२-२३ मध्ये सात लाख ऐंशी हजार कोटी इतकी रक्कम वाढली आहे. सन २०२२-२३ मध्ये पेन्शन कॉर्पस्वर ५१ हजार कोटी रुपयांचे व्याज मिळाले; पण वाटप करण्यात आलेली १४ हजार ४०० कोटी पेन्शन तुटपुंजी होती. मिळालेल्या व्याजाची रक्कम दरमहा किमान पेन्शन नऊ हजारपर्यंत वाढवण्यासाठी पुरेशी आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

नैसर्गिकरीत्या वृद्धापकाळ असलेल्या पेन्शनधारकांच्या उद्ध्वस्त जीवनाबद्दल सरकारची उदासीनता धक्कादायक आहे. घटनेच्या कलम ४१ मध्ये वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजनांची तरतूद आहे आणि म्हणूनच ते केवळ वृद्ध निवृत्तिवेतनधारकांनाच नाही, तर आजारी आणि अपंगांनादेखील समाविष्ट करते. सरकारने वाजवी पेन्शन ही वृद्धापकाळातील सर्वांत महत्त्वाची सुरक्षा आहे हे जाणून घेतले पाहिजे. म्हणूनच या प्रकरणात हस्तक्षेप करावा आणि पेन्शनधारकांना न्याय द्यावा, अशी विनंती शाहू छत्रपती यांनी सभागृहात केली.

शाहू छत्रपती यांनी गेल्या आठवड्यात दिल्ली येथील जंतरमंतर येथे ईपीएस ९५ पेन्शनधारकांच्या धरणे आंदोलनास भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला, तसेच लोकसभेत या विषयावर आवाज उठविण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी मंगळवारी हा विषय उपस्थित करून केंद्र सरकारचे लक्ष वेधले.

Web Title: A minimum pension of nine thousand rupees per month should be paid MP Shahu Chhatrapati demand in Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.