Kolhapur: वादग्रस्त स्टेटस ठेवल्याने कसबा बावड्यात जमावाची घरावर दगडफेक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 01:05 PM2023-10-14T13:05:16+5:302023-10-14T13:05:35+5:30
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने घटनास्थळी धाव घेतल्याने परिस्थिती आटोक्यात आली
कोल्हापूर : कसबा बावडा, गोळीबार मैदान परिसरात एक तरुणाने टिपू सुलतान याचे स्टेटस ठेवल्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने या तरुणाला बेदम मारहाण केली; तसेच त्याच्या घरावर जोरदार दगडफेक केली. हा प्रकार शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. शाहूपुरी पोलिस ठाण्यातील पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने घटनास्थळी धाव घेतल्याने परिस्थिती आटोक्यात आली.
कसबा बावडा परिसरात गोळीबार मैदानाला लागून फतेहअली पाणंद असून तेथे राहणाऱ्या एका तरुणाने त्याच्या मोबाइलवर टिपू सुलतानाचे स्टेटस ठेवले होते. त्याची माहिती बावड्यातील काही तरुणांना मिळाली. या तरुणास काही तरुणांनी रस्त्यात अडवून मारहाण केली. मारहाण होत असल्याचे पाहून तो तरुण त्याच्या घराच्या दिशेने धावला. तरुणांच्या जमावाने त्याचा पाठलाग करून त्याला पुन्हा मारहाण केली; तसेच त्याच्या घरावर दगडफेक केली. जमाव मोठ्या संख्येने जमला होता. ड्यूटी संपवून घरी गेलेल्या दोन पोलिसांनी तत्काळ हा जमाव पांगविण्यास मदत केली, तसेच जमावाची समजूतही काढली.
हा प्रकार समजेल तसा कसबा बावड्यात जमाव वाढू लागला. पोलिसांपर्यंत ही माहिती पोहोचताच पोलिस निरीक्षक अरुणकुमार सिंदकर यांच्यासह पोलिसांनी तत्काळ तेथे धाव घेऊन, स्टेटस ठेवणाऱ्या तरुणास ताब्यात घेऊन शाहूपुरी पोलिस ठाण्यात नेले. त्यानंतर बावडा परिसरात पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली. स्टेटस ठेवणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करावा, त्याला तत्काळ अटक करावी, अशी मागणी परिसरातील तरुणांनी पोलिसांकडे लावून धरली होती. त्यानुसार गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही बावडा परिसरास भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात असल्याची खात्री करून घेतली.
दरम्यान, बंडा साळोखे यांच्यासह काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी रात्री साडेदहा वाजता पोलिस ठाण्यात जाऊन या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची मागणी केली. त्यावेळी पोलिस निरीक्षक सिंदकर यांनी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितल्याने कार्यकर्ते निघून गेले.