कोल्हापूर: ऊसाच्या ट्रॉलीखाली सापडून महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू, ओव्हरटेक करताना झाला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 01:24 PM2022-11-07T13:24:54+5:302022-11-07T13:25:16+5:30
उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
राजेंद्र पाटील
प्रयाग चिखली : ऊसाच्या ट्रॉलीला ओव्हरटेक करताना ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडून महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. बंडेराव भीमराव जाधव (वय ५३, सध्या रा. पाडळी बुद्रुक ता. करवीर, मुळगाव वाघापूर भुदरगड) असे मृताचे नाव आहे. प्रयाग चिखली येथे आज, सोमवारी सकाळच्या सुमारास हा अपघात घडला.
याबाबत माहिती अशी की, बंडेराव जाधव हे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागामध्ये शिपाई म्हणून कार्यरत होते. ते पाडळी बुद्रुक येथे घर जावई होते. पाडळीतून ते कोल्हापूरला निघाले होते. दरम्यान प्रयाग चिखली येथे उसाच्या ट्रॉलीला (MH-१२-BB-५९१) ओव्हरटेक करताना समोरुन वाहन आल्याने दुचाकी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोल जावून ते ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून गंभीर जखमी झाले. उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन बहिणी, एक भाऊ, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
दुर्दैव म्हणजे दोन वर्षांपूर्वी नोव्हेंबर महिन्यातच त्यांचा अपघात होवून ते कोम्यात गेले होते. अनेक दिवसांच्या उपचारानंतर बरे झाले. अन् पुन्हा अपघातातच त्यांच्या मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.