...अन् मुस्लीम दाम्पत्य थेट व्यासपीठावर आले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ऋण फेडले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 10:04 PM2023-06-13T22:04:39+5:302023-06-13T22:06:40+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सादिक गुलाब मकुभाई या जोडप्याकडून आभार पत्र स्विकारले आणि चिमुकलीला हातातही घेतले.
कोल्हापूर - शासन आपल्या दारी या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूरात होते. यावेळी व्यासपीठावर अनोखा प्रसंग पाहायला मिळाला. एक मुस्लीम जोडपे त्यांच्या लहानग्या बाळाला घेऊन थेट व्यासपीठावर आले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार मानले. सुरुवातीला या जोडप्याला मुख्यमंत्र्यांची भेट का घ्यायची आहे याबाबत पोलिसांनी विचारणा केली. त्यानंतर सत्य कळताच प्रशासकीय सूत्रे वेगाने फिरली.
कागल तालुक्यातील एक मुस्लीम जोडपे आपल्या चिमुकली सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेण्यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी आले आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा आग्रह करू लागले. बंदोबस्तास असलेल्या पोलिसांनी तात्काळ उपस्थित स्वयंसेवकांची भेट घालून दिली. भेट का हवी? कारण काय विचारले असता त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून त्यांच्या २६ दिवसांच्या चिमुकलीच्या वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत मिळाल्यामुळे आपल्या मुलीचे प्राण वाचले असं म्हटलं. त्यामुळे आम्हाला कृतज्ञता म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानायचे आहेत असं सांगितले.
त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी तात्काळ, शासन आपल्या दारी उपक्रमाचे राज्य समन्वयक डॉ अमोल शिंदे , अमित हुक्केरीकर आणि प्रभाकर काळे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानंतर या जोडप्याला व्यासपीठावर बोलवण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सादिक गुलाब मकुभाई या जोडप्याकडून आभार पत्र स्विकारले आणि चिमुकलीला हातातही घेतले. कौतुकाने या चिमुकलीला न्याहाळत शेजारी असलेल्या मंत्री चंद्रकांत पाटील यांस बाळाला दाखविले.
निघताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाम्पत्याने मुलीचे नाव काय ठेवलं आहे ? या प्रश्नाला अतिशय भावनिक उत्तर देताना, तुमची आमच्या कुटुंबावर दुवा आहे. म्हणून आमच्या मुलीचे नाव हे आम्ही दुवाच ठेवणार असे चिमुकलीच्या आईने उत्तर दिले.