कोल्हापुरातील अंबाबाईच्या सेवेत नवा रथ, चैत्रातील नगर प्रदक्षिणेची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 01:18 PM2023-01-23T13:18:12+5:302023-01-23T13:18:36+5:30
रथावरील माणसं कमी करा...
कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या सेवेत नवा रथ रुजू होणार आहे. टेंबलाईवाडी येथे नवीन लाकडी रथ आकाराला आला असून, पुढील आठवड्यात तो जोडून त्यावर चांदीचा पत्रा लावण्यात येणार आहे.
दरवर्षी जोतिबा चैत्र यात्रा झाली की, दुसऱ्या दिवशी करवीरनिवासिनी अंबाबाईची चांदीच्या रथातून नगर प्रदक्षिणा निघते. हा रथ लाकडी असून, त्यावर चांदीचा पत्रा लावण्यात आला आहे; पण सध्या वापरात असलेल्या जुन्या रथाची बांधणी सुटत असल्याने तो खूप हालत होता. काही वर्षांपूर्वी रथ ओढत असताना त्यासमोरील लाकडी दांडा निखळला होता. त्यामुळे देवस्थान समितीने रथ बदलण्याचा निर्णय घेतला.
एका भाविकाने दिलेल्या देणगीतून हा लाकडी रथ टेंबलाईवाडी येथे साकारण्यात येत आहे. त्याचे सर्व पार्ट आता तयार झाले असून, पुढील आठवड्यात तो जोडण्यात येणार आहे. नव्या रथाची जोडणी पूर्ण झाली की, त्यावर जुन्या रथावरील चांदीचे पत्रे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे यंदा चैत्र महिन्यात अंबाबाईची नगर प्रदक्षिणा नव्या रथातून होणार आहे.
रथावरील माणसं कमी करा...
नगर प्रदक्षिणा निघते तेव्हापासून हा साेहळा संपेपर्यंत किमान दहा-बारा लोक रथावर उभे असतात. त्यात पुजारी, देवीचे मानकरी, देवस्थानचे कर्मचारी अशा सगळ्यांचा समावेश असतो. अति ओझ्यामुळे रथाची बांधणी सैल होते आणि रथ हलायला लागतो. हा प्रकार टाळायचा असेल तर रथावर कमीत कमी माणसं ठेवली पाहिजेत. त्यासाठी देवस्थान समिती आणि पुजाऱ्यांनी समन्वयाने निर्णय घ्यावा अन्यथा नव्या रथाचीही तीच अवस्था होणार आहे.