गाळपाला जाण्यापूर्वीच ऊस होणार स्वच्छ; उतारा, कारखान्यांची कार्यक्षमता वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 04:16 PM2023-08-03T16:16:40+5:302023-08-03T16:17:29+5:30
कसाही तोडलेला ऊस चालणार
चंद्रकांत कित्तुरे
कोल्हापूर : गाळपासाठी येणारा ऊस कारखान्यात येण्यापूर्वीच स्वच्छ करण्याचे नवे तंत्र शोधण्यात आले आहे. ब्राझीलमधील हे नवे तंत्र भारतातही येऊ घातले आहे. ज्यामुळे साखरेचा उतारा वाढण्याबरोबरच महागड्या यंत्रसामग्रीची झीज कमी होऊन कारखान्यांची कार्यक्षमता सुधारणार आहे. भारताची उत्पादनक्षमता वाढण्यासही या तंत्राचा हातभार लागणार आहे.
शेतातून तोड होऊन गाळपासाठी जो ऊस येतो त्यासोबत धसकट, कचरा, माती, वाळू, दगडाचे खडे, उसाची मुळे, पाचट हेदेखील येतात. ते गाळपापूर्वी वेगळे करण्याची सोय नसल्याने ऊस तसाच गाळपाला जातो. यामुळे कारखान्यातील महागड्या यंत्रसामग्रीचे नुकसान होते, गाळप क्षमतेवर तसेच साखर उताऱ्यावरही प्रतिकूल परिणाम होतो. याबद्दल महाराष्ट्रातील कारखाने मोळीबांधणी वजावट म्हणून प्रति टन ५ टक्के वजन कमी धरतात. याचा फटका शेतकऱ्यांनाही बसतो.
ब्राझीलमध्ये ही धसकटे तसेच नको असलेले इतर पदार्थ कारखान्यात ऊस गाळपाला जाण्यापूर्वीच स्वच्छ करण्याचे तंत्र चार-पाच वर्षांपूर्वी विकसित करण्यात आले आहे. परिणामी, ब्राझीलचा सरासरी साखर उतारा १४ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
भारतीय साखर उद्योगाला या तंत्रज्ञानाचा फायदा व्हावा यासाठी येत्या १२ ऑगस्ट रोजी पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या तंत्राचे यावेळी सादरीकरणही केले जाणार आहे. यावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह साखर उद्योगातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कसाही तोडलेला ऊस चालणार
मजुराने, यंत्राने अशा कोणत्याही प्रकारे तोडलेला ऊस या तंत्रज्ञानाने स्वच्छ करता येतो, भारतातील साखर कारखान्यांना कार्यक्षमता सुधारण्यासाठी हे तंत्रज्ञान वरदान ठरू शकेल, असे राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.