Kolhapur: प्राधिकरण झाले, मग हद्दवाढीचा विषय कशासाठी?; हद्दवाढ विरोधी कृती समितीचे उपोषण
By संदीप आडनाईक | Published: October 16, 2023 06:27 PM2023-10-16T18:27:02+5:302023-10-16T18:30:02+5:30
जिल्ह्याचा प्राधिकरणाद्वारेच विकास होऊ शकतो
कोल्हापूर : प्राधिकरण झाले, मग हद्दवाढीचा विषय कशासाठी, असा प्रश्न उपस्थित करून कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ विरोधी प्रस्तावित गावामधील सर्वपक्षीय कृती समितीने सोमवारी कोल्हापुरात एकदिवसीय उपोषण केले. हा विषय पुन्हा काढल्यास पुन्हा उपोषण करण्याचा इशारा समितीने दिला आहे. यासंदर्भात सोमवारी शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना निवेदन देण्यात आले.
कोल्हापूर नागरी विकास क्षेत्र प्राधिकरण प्राधिकरण १६ ऑगस्ट २०१७ मध्ये नगररचना कायदा कलम ४२ प्रमाणे स्थापन केले आणि हद्दवाढ हा विषय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या मध्यस्थीने व हद्दवाढ विरोधी समिती तसेच हद्दवाढ समर्थक समिती यांच्याशी संयुक्त चर्चा करून निकाली काढला, असे असताना पुन्हा हा विषय उकरून काढला जात आहे. याच्या निषेधार्थ सोमवारी माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे अध्यक्ष भगवान काटे, निमंत्रक राजू माने, उपाध्यक्ष मधुकर जांभळे, सचिव बी. ए. पाटील, प्रवक्ते नारायण पोवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यलयासमोर हे उपोषण करण्यात आले. सकाळी ११ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत झालेल्या या आंदोलनात हद्दवाढीविरोधी गावातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेत हद्दवाढीला विरोध केला.
शहराचे महसूल क्षेत्र व संपूर्ण जिल्ह्याच्या महसूल क्षेत्राचा व लोकसंख्येचा आधार घेऊन प्राधिकरणाच्या परिपत्रकाप्रमाणे बदल करावा, जिल्ह्यातील बेरोजगारी संपवण्यासाठी उद्योग निर्मिती आवश्यक आहे, इचलकरंजी व कोल्हापूर महापालिका, तसेच जिल्ह्यातील नगर परिषद व नगरपंचायतींची संख्या पाहता उद्योग, शेती, पर्यटन विकासाच्यादृष्टीने कोल्हापूर जिल्ह्याचा प्राधिकरणाद्वारेच विकास होऊ शकतो. त्यामुळे हद्दवाढीचा विषय पुन्हा पुन्हा उकरून काढून जनतेमध्ये संभ्रम पसरवणे थांबवावे अशी मागणी समितीने केली आहे. या आंदोलनात महेश चव्हाण, प्रकाश टोपकर, सर्जेराव साळोखे, तानाजी पालकर, संग्राम जाधव, विश्वजीत बगाडे, पृथ्वीराज पाटील, दिलीप पुजारी, प्रकाश सुर्यवंशी, बाळासाहेब साळोखे, कावजी कदम, रवींद्र चौगुले यांनी भाग घेतला.