तिकीटाची विचारणा केल्याने रेल्वेत चाकूहल्ला; कर्मचारी जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 12:35 PM2024-05-17T12:35:10+5:302024-05-17T12:37:02+5:30

जखमींवर बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

A passenger attacked two people with a knife who were asking for tickets in the train including a ticket inspector, The employee was killed on the spot | तिकीटाची विचारणा केल्याने रेल्वेत चाकूहल्ला; कर्मचारी जागीच ठार

तिकीटाची विचारणा केल्याने रेल्वेत चाकूहल्ला; कर्मचारी जागीच ठार

बेळगाव : धावत्या रेल्वेत तिकिटाची विचारणा करणाऱ्या तिकीट तपासणीसासह दोघांवर प्रवाशाने धारदार चाकूने हल्ला केला. त्यात एका कंत्राटी रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर दोघे जण जखमी झाले. ही घटना लोंढा ते गुंजीदरम्यान गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास झाली. ठार झालेल्या रेल्वे कर्मचारी युवकाचे नाव देवर्षी (वय २२, रा. झांशी) असे आहे.

तो रेल्वेमध्ये प्रवाशांना बेडरोल कर्मचारी म्हणून कंत्राटी पद्धतीवर कामाला होता. जखमींमध्ये तिकीट तपासनीस अश्रफ कित्तूर् आणि कंत्राटी रेल्वे कर्मचारी शोएब शेख यांचा समावेश आहे. जखमींवर बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

रेल्वे तिकीट तपासनीस अश्रफ कित्तूर हे दुपारी हुबळीहून पाँडेचेरीला निघालेल्या रेल्वे क्र. ११००६ मध्ये नेहमीप्रमाणे तिकीट तपासण्याचे काम करत होते. यावेळी लोंढा ते गुंजीदरम्यान स्लीपर क्लासमध्ये तपासणी करताना त्यांनी दरवाजाजवळ थांबलेल्या सात-आठ प्रवाशांना तिकिटाची विचारणा केली. त्यांच्यापैकी चौघा जणांकडे तिकीट नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर अश्रफ यांनी त्यांना दंड ठोठावला. त्यानंतर दरवाजाजवळ थांबलेल्या प्रवाशाकडे तिकिटाची विचारणा केली. त्यावेळी मला तिकीट विचारतोस का, असा जाब विचारून त्या प्रवाशाने अश्रफ यांच्यावर अचानक चाकूने हल्ला चढवला. 

चाकू पोटाला लागणार हे लक्षात येताच क्षणार्धात प्रसंगावधान राखून अश्रफ मागे सरकले. मात्र, तरीही त्यांच्या डाव्या हाताच्या पंजाला चाकूचा वार झाला. अश्रफ यांच्याजवळ थांबलेला बेडरोल कर्मचारी देवर्षी हा तिकीट तपासणी साहेबांचा माणूस आहे, असे समजून त्या हल्लेखोर प्रवाशाने थेट देवर्षी याच्या छातीत चाकू खुपसला. त्यामुळे देवर्षी रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच गतप्राण झाला. दरम्यान, हल्लेखोर प्रवाशाने रेल्वेतून उडी टाकून घटनास्थळावरून पलायन केले. या घटनेप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून, पोलिस हल्लेखोर प्रवाशाचा शोध घेत आहेत.

Web Title: A passenger attacked two people with a knife who were asking for tickets in the train including a ticket inspector, The employee was killed on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.