Kolhapur: विषाने तारले, तरी मृत्यूने गाठलेच!, सीपीआरच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन तरुणाने संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 01:53 PM2024-08-19T13:53:36+5:302024-08-19T13:54:59+5:30
कोल्हापूर : तणनाशक प्राशन केल्याने उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णाने सीपीआरमधील दूधगंगा इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेतली. तळमजल्यावरील पोर्चच्या स्लॅबवर ...
कोल्हापूर : तणनाशक प्राशन केल्याने उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णाने सीपीआरमधील दूधगंगा इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेतली. तळमजल्यावरील पोर्चच्या स्लॅबवर पडल्याने गंभीर जखमी झालेला रुग्ण साताप्पा भंडेराव लोहार (वय ३५, रा. आकुर्डे, ता. भुदरगड) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. १८) सायंकाळी घडली.
सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार आकुर्डे येथील साताप्पा लोहार हा मुंबईत एका हॉटेलमध्ये काम करत होता. आठवड्यापूर्वी तो सुटीसाठी गावाकडे आला. नैराश्यातून त्याने बुधवारी (दि. १४) राहत्या घरात तणनाशक प्राशन केले. हा प्रकार लक्षात येताच नातेवाइकांनी त्याला सीपीआरमध्ये दाखल केले. तणनाशक पचवून त्याच्या शरीराने मृत्यूला हरवले. मात्र, मनाने तो अस्वस्थ होता. रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दूधगंगा इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील खिडकीतून त्याने उडी घेतली.
तळमजल्यावरील पोर्चच्या स्लॅबवर पडून तो गंभीर जखमी झाला. हा प्रकार लक्षात येताच त्याच्या पत्नीने आरडाओरडा करून सुरक्षा रक्षकांना बोलावून घेतले. सुरक्षा रक्षकांनी तातडीने स्लॅबवर चढून जखमी अवस्थेतील लोहार याला खाली घेऊन उपचारासाठी अपघात विभागात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सोमवारी त्याला डिस्चार्ज मिळणार होता. तत्पूर्वीच त्याने आत्महत्या केली. सीपीआर पोलिस चौकीत घटनेची नोंद झाली.