..अन् रुग्णाने रुग्णालयातून उडी घेत संपवले जीवन, कोल्हापुरातील धक्कादायक घटना
By उद्धव गोडसे | Published: February 9, 2023 05:43 PM2023-02-09T17:43:12+5:302023-02-09T18:03:20+5:30
उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला
कोल्हापूर : येथील लक्ष्मीपुरी परिसरात सुभाष रोडवरील एका खासगी रुग्णालयात उपचार घेणा-या रुग्णाने पहिल्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. जयसिंग नामदेव कणसे (वय ४८, सध्या रा. शिरोली पुलाची, मूळ रा. सातारा) असे मृताचे नाव आहे. ही घटना आज, गुरुवारी (दि. ९) पहाटे घडली. कणसे यांनी आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयसिंग कणसे हे कामाच्या निमित्ताने शिरोली पुलाची येथे एमआयडीसी परिसरात राहत होते. दोन दिवसांपूर्वी ते उपचारासाठी सुभाष रोडवरील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. आज, गुरुवारी पहाटे त्यांनी रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारली.
यात गंभीर दुखापत झाल्याने कणसे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. सीपीआरमध्ये उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात झाली.
रुग्णालय कर्मचाऱ्यांची तारांबळ
कणसे यांच्यावर दोन दिवस व्यवस्थित उपचार सुरू होते. मात्र, गुरुवारी पहाटे अचानक त्यांनी रुममधून बाहेर पडून पहिल्या मजल्यावरून उडी घेतली. रुग्णाने आत्महत्या केल्यामुळे कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली.