जोतिबा विकासासाठी एक हजार कोटींचा विकास आराखडा, अर्थसंकल्पात निधीची तरतूद होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 01:32 PM2023-03-03T13:32:55+5:302023-03-03T13:33:28+5:30
जोतिबा देवाच्या कोणकोणत्या जिल्ह्यात किती जमिनी आहेत याचा सध्या देवस्थान समिती शोध घेत आहे
कोल्हापूर : वाडी रत्नागिरी येथील जोतिबा मंदिर परिसर विकासासाठी एक हजार कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी करण्यात येत असलेल्या प्राधीकरणच्या नियमावलीचा मसुदाही आता तयार झाला असून येत्या अर्थसंकल्पामध्ये यासाठी निधीची तरतूद होण्याची शक्यता आहे.
जोतिबा मंदिर व परिसराच्या विकासासाठी प्राधीकरण करण्याचा निर्णय दोन महिन्यांपूर्वी मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानंतर आमदार विनय कोरे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांना प्राधीकरणाचा कच्चा मसुदा तयार करण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार नाईकवाडे यांनी प्राधीकरणाची नियमावली व मसुदा तयार केला आहे. प्राधीकरणाअंतर्गत जोतिबा डोंगरासह आसपासच्या २५ गावांचाही विकास करण्यात येणार आहे. त्यात वाघबीळ ते कासारवाडीपर्यंतच्या गावांचा समावेश आहे.
अख्खा जोतिबा डोंगर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारित आहे. इतर जमिनी या शासकीय गायरान, वनखात्याच्या अखत्यारित आहे. त्यामुळे प्राधीकरणामध्ये देवस्थान समितीसोबतच महसूल, कृषी, वन, सार्वजनिक बांधकाम अशा संबंधित सर्व खात्यांच्या सहभागातून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती व राजकीय नेत्यांची समिती असे दोन समित्या करण्याचे नियोजन आहे.
या प्राधीकरणाचा मसुदा आता तयार झाला असून तो मंजुरीसाठी प्रस्तावित आहे. त्याला मान्यता मिळाली की अर्थसंकल्पीय अधिवेशनात तो मांडला जाऊन त्यासाठी निधीची तरतूद होण्याची शक्यता आहे.
आराखड्यातील समाविष्ट बाबी
भाविकांसाठी अन्नछत्र, यात्री निवास त्यासाठी स्वतंत्र न्यासाची स्थापना. अकरा मारुती, नगर प्रदक्षिणा मार्गाचा विकास. जोतिबा ते पन्हाळा रोप वे, हरितपट्टा, जंगल संवर्धन, सामाजिक वनीकरण.
जमिनींच्या शोधासाठी तहसीलदारांना पत्र
जोतिबा देवाच्या कोणकोणत्या जिल्ह्यात किती जमिनी आहेत याचा सध्या देवस्थान समिती शोध घेत आहे. त्यासाठी सर्व जिल्ह्यांतील प्रांताधिकारी व तहसीलदारांना पत्र पाठवून याबाबतची माहिती देण्याची विनंती करण्यात आली आहे.