Kolhapur: ‘न्यूटन’ कंपनीविरोधात पोलिसांत तक्रार, बोगस परवाना दाखवून कोट्यवधीचा औषध पुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 05:13 PM2024-02-15T17:13:21+5:302024-02-15T17:14:57+5:30
छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील औषध घाेटाळा ‘लाेकमत’ने उघड केला
कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात अन्न व औषध प्रशासन विभागाचा बोगस परवाना दाखवून कोट्यवधीचा औषध पुरवठा करणाऱ्या न्यूटन एंटरप्रायझेस कंपनीविरोधात अखेर अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांनी बुधवारी लक्ष्मीपुरी पोलिसांत तक्रार दाखल केली. शिवसेना (उबाठा) आक्रमक झाली असून, त्यांनी अधिष्ठाता डॉ. गुरव यांच्यासह जबाबदार यंत्रणेला तब्बल दीड तास धारेवर धरले. यामध्ये हात ओले झालेल्यांची चौकशी करून संबधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी लावून धरली.
छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील औषध घाेटाळा ‘लाेकमत’ने उघड केला होता. याविषयी जाब विचारण्यासाठी शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकाऱ्यांनी थेट रुग्णालयावर धडक दिली. रुग्णालयात गरज नसणारी औषधे खरेदी करून कोणाचा खिसा भरला? असा आरोप करत संजय पवार म्हणाले, गोरगरिबांसाठी आधारवड असलेल्या सीपीआरमध्ये ३४७ रुपयांचे कीट ११७० रुपयांना खरेदी केले. अन्न व औषध प्रशासन विभागाचा बोगस परवाना जोडला, त्यांची शहानिशा न करता त्यांच्याकडून नऊ कोटींची औषधे खरेदी करता, त्याचे ई-बिलिंग न हाेताच त्याला बहुतांशी रक्कम देता, हे कोणत्या कायद्यात बसते? यामध्ये न्यूटन कंपनी दोषी नाही तर आपल्यासह जबाबदार अधिकाऱ्यांचेही हात बरबटल्याचा आरोप पवार यांनी केला.
सहसंपर्क प्रमुख विजय देवणे म्हणाले, ‘लोकमत’ने हा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला, अन्न-औषध प्रशासनाने १ फेब्रुवारीला संबंधित कंपनीचा परवाना बोगस असल्याचे कळवले तरी आपण त्यांच्यावर फौजदारी दाखल केली नाही. यामध्ये दोषी असलेले रमेश खेडकर, ‘न्यूटन’ कंपनीचे अजिंक्य पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय हलणार नसल्याचा इशारा दिला. संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकत असतानाच लक्ष्मीपुरी पोलिसांत कंपनीविरोधात तक्रार अधिष्ठातांनी दाखल केल्यानंतरच शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कार्यालय सोडले.
यावेळी शहरप्रमुख सुनील मोदी, विशाल देवकुळे, हर्षल सुर्वे, प्रतिज्ञा उत्तुरे, हर्षल पाटील, राजू यादव, सुरेश पोवार, कमलाकर जगदाळे, महेश उत्तुरे, शुभांगी पोवार, दत्ताजी टिपुगडे, स्मिता सावंत, रूपाली घोरपडे, आसावरी सुतार, प्रेरणा बाकळे, माधुरी जाधव, मंगल पोवार, वर्षा पाटील, माधुरी जाधव, आदी उपस्थित होते.
भ्रष्टाचाराच्या घुसी आणि औषध
‘सीपीआर’मधील राजकीय व प्रशासकीय भ्रष्टाचाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने औषधाच्या पुड्या लावलेले बॉक्स आणले होते.
औषध स्टॉकचा शिवसेनेने केला पोलखोल
सीपीआरमधील औषध स्टॉकची आवक-जावक नोंदणी रजिस्टरची तपासणी करून पोलखोल केला. वर्षाच्या मागणीपेक्षा कितीतरी पटीने अधिक स्टॉक करून ठेवल्याचे उघड झाल्यानंतर संजय पवार यांनी अधिष्ठातांना धारेवर धरले.
‘तुळशी’ इमारतीमधील कँटीन चालकाला नोटीस
कोरोनाच्या काळात रुग्णांच्या सोयीसाठी सीपीआरच्या ‘तुळशी’ इमारतीमध्ये कँटीनला परवानगी दिली. कोरोना जाऊन तीन वर्षे झाले तरी विनामोबदला राजू करंबे कँटीन चालवतो. त्याची निविदा काढली का? मग त्यामध्ये तुमची वाटणी आहे का? असा जाब शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी विचारला. यावर तत्काळ सीपीआर प्रशासन, महापालिका, अन्न-ओैषध विभागाची परवानगी २४ तासात सादर करण्याची नोटीस रुग्णालय प्रशासनाने करंबे यांना काढली आहे.
‘राजू’ नावाच्या ग्रहणापासून सावध राहा
औषध खरेदी कोणाच्या दबावाखाली केली, विना निविदा कँटीन कोणाच्या आदेशाने सुरू आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. ‘राजू’ नावाचे ग्रहण तुम्हाला लागले असून, त्यापासून सावध राहा, असा इशारा रविकिरण इंगवले यांनी दिला.