Kolhapur: कारची दुचाकीस पाठीमागून धडक, अपघातात कोगनोळीतील गर्भवती जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 07:21 PM2024-07-30T19:21:33+5:302024-07-30T19:24:07+5:30
कोगनोळी : मालवाहतूक कंटेनरला ओव्हरटेक करताना पाठीमागून येणाऱ्या कारने दुचाकीस जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरून खाली पडून कंटेनरच्या ...
कोगनोळी : मालवाहतूक कंटेनरला ओव्हरटेक करताना पाठीमागून येणाऱ्या कारने दुचाकीस जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरून खाली पडून कंटेनरच्या चाकाखाली सापडल्याने गर्भवती महिला जागीच ठार झाली. सुशीला रवींद्र खोत (वय २८, रा. हणबरवाडी-कोगनोळी ता. निपाणी) असे मृत महिलेचे नाव आहे. कागल येथील आरटीओ चेक पोस्टसमोर आज, मंगळवारी दुपारी हा अपघात घडला.
सुशीला या गर्भवती होत्या. त्या वैद्यकीय तपासणीसाठी पती रवींद्र बाळासो खोत व मुलगा विराज यांच्यासोबत दुचाकीवरून कागल येथील खासगी रुग्णालयाकडे निघाल्या होत्या. मोटरसायकल कागल येथील आरटीओ चेक पोस्ट समोर आली असता मालवाहतूक कंटेनरला ओव्हरटेक करताना पाठीमागून येणाऱ्या कारने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातामुळे सुशीला या दुचाकीवरून खाली पडल्या व कंटेनरच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाल्या. तर पती रवींद्र व मुलगा विराज हे गंभीर जखमी झाले.
जखमींना कागल येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. कागल येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सुशीला यांच्या पश्चात पती, मुलगा, सासू-सासरे असा परिवार आहे. गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचे समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.