मस्करी केल्याच्या रागातून कारागृहात कैद्याचा डोक्यात दगड घालून खून, कोल्हापुरातील घटना; सुरक्षा रामभरोसे 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 11:21 AM2023-02-06T11:21:38+5:302023-02-06T11:22:05+5:30

कारागृहात १६९९ कैद्यांची क्षमता असताना सध्या २१६० कैदी, कर्मचारी अवघे ३७ टक्के

A prisoner was killed by a stone on his head in Kalamba Jail in Kolhapur | मस्करी केल्याच्या रागातून कारागृहात कैद्याचा डोक्यात दगड घालून खून, कोल्हापुरातील घटना; सुरक्षा रामभरोसे 

मस्करी केल्याच्या रागातून कारागृहात कैद्याचा डोक्यात दगड घालून खून, कोल्हापुरातील घटना; सुरक्षा रामभरोसे 

Next

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक गुन्ह्यांतर्गत शिक्षा भोगत असलेला कैदी सतपालसिंग जोगिंदरसिंग कोठाडा (वय ३९, रा. डिंपल कौर, सायन कोठीवाडा, मुंबई) याचा दुसऱ्या कैद्याने डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला. ही घटना रविवारी (दि. ५) पहाटे दोनच्या सुमारास घडली. याप्रकरणी गणेश लक्ष्मण गायकवाड (वय २९, मूळ रा. वाशी, रमाबाई झोपडपट्टी) याच्यावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मस्करी केल्याच्या रागातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती कारागृह अधिकाऱ्यांनी दिली. कैद्यानेच कैद्याचा खून केल्यामुळे कळंबा कारागृहातील सुरक्षेचे तीनतेरा वाजल्याचे स्पष्ट झाले आहे. बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी दहा वर्षांची शिक्षा झालेला सतपालसिंग हा २०१७ पासून कळंबा कारागृहात शिक्षा भोगत होता. तर संशयित हल्लेखोर आरोपी गणेश गायकवाड हा ठाणे येथे खून केल्याच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. २०२१ पासून तो कळंबा कारागृहात शिक्षा भोगत आहे. सतपालसिंग आणि गायकवाड हे दोघे कारागृहातील ओळखीनंतर मित्र बनले होते. दोघेही कारागृहातील रुग्णालयाच्या स्वच्छतेचे काम करीत होते.

शनिवारी रात्री हे दोघे रुग्णालयात झोपले होते. मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास गायकवाड याने सतपालसिंगच्या डोक्यात दगड घातला. मोठा आवाज होताच ड्युटीवर असलेले दोन शिपाई रुग्णालयात गेले. त्यावेळी सतपालसिंग हा गंभीर जखमी अवस्थेत पडलेला दिसला. त्याला तातडीने सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. साडेतीनच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. शिपाई अक्षय कैलास वाघमारे यांनी याबाबतची फिर्याद जुना राजवाडा पोलिसात दिली.

मस्करीतून खून झाल्याचा संशय

कैदी सतपालसिंग आणि गायकवाड हे दोघे नेहमीच एकमेकांची चेष्टा मस्करी करीत होते. शनिवारी रात्री सतपालसिंग याने वाघमारे याची चेष्टा केली होती. त्याच रागातून हा खून झाला असावा, अशी माहिती कारागृह अधिकाऱ्यांनी दिली. जुना राजवाडा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

कळंबा कारागृहात गांजा, मोबाइल सापडण्याचे प्रकार आता नेहमीच सुरू असतात. तसेच कैद्यांच्या दोन गटांमध्ये मारामारी, कारागृह कर्मचाऱ्यांना कैद्यांकडून मारहाण होणे, धमकावणे, कैद्यांकडून कैद्यांचा छळ होणे अशा घटनाही सुरू आहेत. आता कैद्याचा खून झाल्यामुळे कारागृहातील सुरक्षा राम भरोसे असल्याचे स्पष्ट झाले.

कर्मचारी अवघे ३७ टक्के

कारागृहात १६९९ कैद्यांची क्षमता असताना सध्या २१६० कैदी शिक्षा भोगत आहेत. त्यामध्ये मुंबई, पुण्यातील गंभीर गुन्ह्यांमधील कैद्यांचा समावेश आहे. कैद्यांचा भार वाढत असताना कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची संख्या मात्र खूपच कमी आहे. कारागृहात ३०० कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना सध्या केवळ ११० कर्मचारी आणि अधिकारी कार्यरत आहेत. त्यामुळे केवळ ३७ टक्के कर्मचाऱ्यांवर कळंबा कारागृहाच्या सुरक्षेचा भार आहे.

Web Title: A prisoner was killed by a stone on his head in Kalamba Jail in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.