कोल्हापूर: आळवेत एका खासगी शाळेच्या बसचा अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 01:07 PM2022-07-11T13:07:37+5:302022-07-11T13:15:18+5:30
रस्ता अरूंद असल्याने या रस्त्याच्या दुरूस्तीची वेळोवेळी मागणी करून देखील प्रशासनाने याकडे दुर्लंक्ष केले
करंजफेण : पन्हाळा तालुक्यातील माळवाडी - कोतोली येथील श्रीपतराव चौगुले शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूलबस रस्त्यावरून घसरून बाजूच्या शेतात उलटली. या अपघातात बसमधील दोघा कर्मचार्यांना किरकोळ दुखापत झाली. मात्र, सुदैवाने कोणत्याही विद्यार्थ्यांला दुखापत झाली नाही.
के. एस. चौगुले शाळेची स्कूल बस विद्यार्थ्यांना घेऊन आळवे मार्गावरुन निघाली होती. यादरम्यान अरूंद रस्त्यावरून समोरून येणार्या वाहनाला बाजू करुन देत असताना रस्त्याचा काही भाग खचल्याने बस शेतात उलटली. सदैवाने यात विद्यार्थ्यांना दुखापत झाली नाही. मात्र बसमधील दोघा कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघतानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचार्यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली. तर, जखमी कर्मचार्यांच्यावर उपचार केले.
याअपघातानंतर या रस्ताची तातडीने दुरूस्ती केली जावी अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरत आहे. रस्ता अरूंद असल्याने या रस्त्याच्या दुरूस्तीची वेळोवेळी मागणी करून देखील प्रशासनाने याकडे दुर्लंक्ष केले आहे. त्याचबरोबर करंजफेण तसेच भाचरवाडी रस्ता देखील अतिशय धोकादायक बनला असल्यामुळे जीवीतहानी झाल्यावर प्रशासनाला जाग येणार आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.