Kolhapur: गगनबावड्यात आढळला दुर्मीळ ‘मॉण्टेनचा तस्कर’ साप, आर. आर. आबांच्या भाच्याने लावला शोध
By संदीप आडनाईक | Published: August 4, 2023 12:32 PM2023-08-04T12:32:58+5:302023-08-04T12:33:19+5:30
डॉ. अमित पाटील हे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे भाचे
कोल्हापूर : गगनबावडा परिसरात ‘मॉण्टेनचा तस्कर’ हा अतिशय दुर्मीळ सहज न आढळणारा साप आढळला आहे. गगनबावडा येथील ग्रामीण रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करणारे डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील यांनी या सापाचा शोध लावला आहे.
गगनबावडा परिसरात दि. २ ऑगस्ट रोजी डॉ. अमित यांना सकाळी साडेअकरा-बाराच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरातच हा दुर्मीळ प्रजातीचा पूर्णवाढ झालेला तस्कर साप आढळला. तो ४-४.५ फूट लांबीचा आणि १-१.२५ इंच जाडीचा आहे. सामान्य तस्कर सापापेक्षा याचा रंग जास्त गडद आणि डोक्यावरील पट्टे वेगळे असल्याने त्यांनी इंटरनेवरून माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही समजू शकले नाही.
दरम्यान, राधानगरीच्या बायसन नेचर क्लबचे सम्राट केरकर यांच्या माध्यमातून सरिसृप अभ्यासक डॉ. वरद गिरी आणि कर्नाटकातील प्राणिशास्त्रज्ञ डॉ. दीपक देशपांडे यांच्याशी त्यांनी फोनवरून संपर्क साधला. डॉ. देशपांडे यांनी त्यांना काही संदर्भ पाठवले. तर डॉ. गिरी यांनी पाठविलेल्या विविध फोटोंच्या आधारे हा ‘सामान्य तस्कर’ साप नसून ‘मॉण्टेनचा तस्कर’ असल्याचे स्पष्ट झाले. डॉ. वरद गिरी यांनी डॉ. अमित पाटील यांनी सापांच्या केलेल्या अभ्यासाबद्दल त्यांचे कौतुकही केले.
तस्कर हा बिनविषारी साप असून अतिशय उजळ रंगाचा असून देखणा असतो. सुमारे ४.५-५ फूट वाढणारा हा साप धोक्याची जाणीव होताच हल्ल्याचा वैशिष्ट्यपूर्ण पवित्रा घेतो. शक्यतो दाट जंगलात वाळवीच्या बिळांमध्ये राहतो आणि उंदीर, सरडे, पाली, लहान पक्षी हे त्याचे खाद्य आहे.
गगनबावडा परिसरातील सापांच्या ठेवल्यात नोंदी
डॉ. अमित पाटील हे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे भाचे आहेत. त्यांनी गगनबावडा परिसरात मलबार पिट वायपर, बांबू पिट वायपर, बेडॉम्स कॅट स्नेक, फ्रॉर्स्टेन्स कॅट स्नेक, वोल्फ स्नेक, हिरवा नाग म्हणून ओळखला जाणारा ग्रीन किलबॅक, चेकर्ड किलबॅक, बफ स्ट्राइप्ड किलबॅक, खापरखवल्या, नाग, मण्यार, घोणस, फुरसे, धामण अशा बऱ्याच प्रजातींच्या सापांच्या नोंदी ठेवल्या आहेत.
या मॉण्टेन प्रजातीच्या सापांमध्ये डोक्यावरील आणि अंगावरील पट्ट्यांनुसार सहा प्रकार आढळतात. नव्याने आढळलेला हा साप तिसऱ्या उपप्रकारातील आहे. -डॉ. वरद गिरी, सरिसृपतज्ज्ञ.