Kolhapur: बॅडमिंटन खेळतानाच मृत्यूने गाठले, मिणचे खुर्द येथील निवृत्त अभियंताचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
By उद्धव गोडसे | Published: June 26, 2023 02:31 PM2023-06-26T14:31:20+5:302023-06-26T14:32:24+5:30
खेळता-खेळता अचानक श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागला. खेळ थांबवून ते बाजूला बसताच कोसळले
कोल्हापूर : पाटबंधारे विभागातून सेवानिवृत्त झालेले अभियंता केरबा शिवाजी सुतार (वय ६६, सध्या रा. बोंद्रेनगर, कोल्हापूर, मूळ रा. मिणचे खुर्द, ता. भुदरगड) यांचा बॅडमिंटन खेळताना हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. २६) सकाळच्या सुमारास पाडळी रोड येथील गगनगिरी पार्कमध्ये घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मूळचे मिणचे खुर्द येथील अभियंता केरबा सुतार हे पाटबंधारे विभागात कार्यरत होते. गेल्या काही वर्षांपासून ते कुटुंबीयांसह बोंद्रेनगर येथील घरात राहत होते. नोकरीत असल्यापासून ते रोज सकाळी मित्रांसोबत बॅडमिंटन खेळत होते. नेहमीप्रमाणे आज, सोमवारी सकाळी ते बॅडमिंटन खेळण्यासाठी पाडळी रोड येथील गगनगिरी पार्कमध्ये गेले होते. खेळता-खेळता अचानक त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागला. खेळ थांबवून ते बाजूला बसताच कोसळले. हा प्रकार लक्षात येताच मित्रांनी त्यांना तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
शवचिकित्सा केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आला. मूळ गावी मिणचे खुर्द येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अनपेक्षित मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातू असा परिवार आहे.