सोशल मीडियावर लिंक पाठवून कोल्हापुरातील निवृत्त शिक्षिकेला ५९ लाखांना गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 01:57 PM2024-07-05T13:57:40+5:302024-07-05T13:58:05+5:30
परतावाही नाही, अकौंटही बंद
कोल्हापूर : फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामवर लिंक पाठवून त्या माध्यमातून अॅप डाऊनलोड करण्यास सांगून २० टक्के डिस्काऊंटवर शेअर्स देण्याच्या बहाण्याने येथील निवृत्ती शिक्षिकेची तब्बल ५८ लाख ५३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले. याबाबत सुनीता विद्याधर गाट (रा. बापट कॅम्प) यांनी शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री फिर्याद दिली. १९ एप्रिल ते ३० मे २४ या कालावधीत टप्प्याटप्प्याने ही फसवणूक करण्यात आली आहे.
भारतीय दंडविधान संहिता कलम ४०६,४२०,३४ सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९३ ३,४ प्रमाणे आरोपी नरेश डी. जडेजा व शिवांगी अगरवाल पूर्ण पत्ता माहीत नाही यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी सांगितले, जडेजा आणि अगरवाल यांनी फेसबुक व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामवर MSFL या कंपनीची खोटी जाहिरात देऊन लिंकही शेअर करण्यात आली.
यानंतर त्यावरून त्यांच्या एमएसएफएल कनेक्ट (A७७७) या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड होण्यास सांगून, त्यावर ब्लॉक ट्रेडिंग तसेच आयपीओबद्दल माहिती सांगितली. या व्यवहारातून तुम्हांला १० ते २० टक्के डिस्काउंटवर शेअर्स मिळतील व त्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होईल असे आमिष दाखवले.
एकदा का विश्वास संपादन केला की मग त्या दोघांनी या व्हॉट्सॲप ग्रुपवर शिवांगी ७७७ ही टेलिग्राम लिंक पाठवून त्यावरून एमएसएफएल हे ॲप डाउनलोड करायला सांगितले व एमएसएलएफ ऑनलाइन ३३ ही लिंक पाठवून त्यावरून वरीलप्रमाणे विविध बँक अकाउंटची माहिती देऊन त्यांच्या बँक अकाउंटवर वेळोवेळी गाट यांना ५८ लाख ६३ हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार हे पैसे भरण्यात आले.
परतावाही नाही, अकौंटही बंद
मे २०२४ च्या अखेरपर्यंत हे पैसे भरण्यात आले. परंतु नंतर परतावाही बंद झाला आणि अकौंटही बंद झाले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे गाट यांच्या लक्षात आले. याबाबत वेगवेगळ्या पातळ्यांवर त्यांच्या कुटुंबीयांनी चौकशी केली. माहिती घेतली. परंतु कुठूनच याबाबत पैसे परत मिळण्याची शक्यता मावळल्याने अखेर त्यांनी पोलिसात धाव घेतली.
मोबाइल कधीही बंद होऊ शकतो
अशी फसवणूक करणारी माणसे आपला मोबाइल कधीही बंद करू शकतात. हे वास्तव ध्यानात न घेता एखाद्याचा मोबाइल आपल्याकडे आहे म्हटले की माणूस विश्वासाने व्यवहार करतो. परंतु समोरच्याने फोनच उचलला नाही, कट केला, बंद करून टाकला तर काय करणार, याचा सारासार विचार होत नाही आणि मग अशा फसवणुकीला बळी पडावे लागते. ज्यांचा नेमका पत्ताच माहिती नाही अशांशी सवलतीच्या शेअर्सच्या मोहाने केलेला व्यवहार या शिक्षिकेला महागात पडला.