वैध परवानाशिवाय रिक्षा व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकास दहा हजाराचा दंड!
By सचिन भोसले | Published: August 4, 2023 11:32 PM2023-08-04T23:32:12+5:302023-08-04T23:33:25+5:30
करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात.
कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मंदिर परिसरात भाविकांशी मुजोरी करणाऱ्या रिक्षा चालकावर जुनाराजवाडा पोलिसांनी शुक्रवारी कारवाईचा बडगा उगारला. संबधित रिक्षा चालकाच्या रिक्षाच्या कागदपत्रांची तपासणी करीत असताना त्याच्याकडे वैधपरवाना नसल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी तब्बल दहा हजाराचा दंड केला.
करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. दर्शनानंतर भाविक शहरातील विविध पर्यटन स्थळांना भेट देतात. इप्सित स्थळी पोहोचण्यासाठी रिक्षा चालकांकडे चौकशी केली असता अमुक इतके भाडे होईल. असे काही रिक्षाचालक सांगतात. यातील काही रिक्षा चालक नावाच्या सव्वा भाडे आकारून भाविकांशी मुजोरी करतात. याबाबत शुक्रवारी भाविकांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश कुमार गुरव यांच्याकडे तक्रार केली होती.
त्यानुसार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी यांनी एम.एच.०९ - एस - ६१३९ या क्रमांकाच्या रिक्षाची कागदपत्रे चालकाकडे मागितली. तपासणीअंति रिक्षाचा परवाना वैध नसल्याची आढळून आले. हा वाहतूक नियमांचा भंग व अपराध व दंड असे कलम ६६(१), कलम१९२(आ) ही कारवाई करण्यात आली. इतक्या मोठ्या प्रमाणावर दहा हजार इतका दंड केल्याने या दंडाची पावती सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यामुळे रिक्षाचालकांस सर्वसामान्यांमध्ये हा दंड म्हणजे चर्चेचा विषय ठरला. अशा मुजोर रिक्षाचालकांवर यापुढेही कारवाई होईल, असे ही पोलीस निरीक्षक गुरव यांनी स्पष्ट केले.